न्यायालयीन चौकशीची गरज नाही,ठकसेनांच्या मालमत्ता जप्त करणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : राज्यात सध्या गाजत असलेल्या नोकरी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी विरोधी पक्षांकडून होणारी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी 18 जणांवर कारवाई केली असून पोलिस तपास योग्य दिशेने सुरु आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर नोकरीसाठी पैसे घेतलेल्या सर्व ठकसेनांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील. त्यातून ज्यांचे पैसे हडप करण्यात आले आहेत, त्यांना ते परत करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. राज्यात गाजणाऱ्या नोकरीसाठी पैसे घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य अनेकांसाठी दिलासादायक ठरले आहे. मंगळवारी चिंबल येथे आयोजित फ्लायओव्हरच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. नोकरीसाठी पैसे घेतलेल्या कुणालाही क्षमा करणार नाही, अस इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच हे सर्व पैसे व मालमत्ता जप्त करून ते संबंधितांना परत करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.