अंडी खाण्यास हरकत नाही!
मंत्री दिनेश गुंडूराव यांचा निर्वाळा
बेळगाव : अंड्यांमध्ये कॅन्सरकारक अंश आढळून आला आहे, याविषयी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे. अंडी खाताना कोणीही घाबरण्याची गरज नाही. अंडी आरोग्यासाठी चांगली आहेत. ती खाऊ शकता, असा निर्वाळा त्यांनी दिला हे अंड्यांच्या दरवाढीसंबंधी विधानसभेत माहिती देत असताना एका आमदाराने अंड्यांविषयी भीतीदायक बातम्या येत आहेत. अंडी खाल्ल्याने कॅन्सर होतो, असे सांगितले जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी याविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले, अंडी खाताना मनात कोणत्याही प्रकारची भीती नको, 147 अंड्यांच्या नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे.
यापैकी केवळ एक अंडे सदोष आढळून आले आहे. इतर 146 अंड्यांचे नमुने खाण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अंड्यांचे दर वाढल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांकरिता वितरित होणाऱ्या अंडी खरेदी करण्यासाठी सध्या ठरविण्यात आलेले दर वाढवण्यासंबंधी सरकारचा विचार सुरू आहे, असे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले. भाजप आमदार हरिश पुंजा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आठवड्यातून सहा दिवस अंडी किंवा केळी वितरित केली जात आहेत. अंड्यांसाठी सरकार प्रत्येक विद्यार्थ्याला 5 रुपये रोज याप्रमाणे दोन दिवसांचे पैसे देत आहे. ही रक्कम कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त रक्कम देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.