For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मी म्हणजे हा देह नव्हे हे ज्याला समजते त्याला शरीराचा नाश होण्याचे भय नसते

06:09 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
मी म्हणजे हा देह नव्हे हे ज्याला समजते त्याला शरीराचा नाश होण्याचे भय नसते
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

आपण कर्ते नसून भगवंत कर्ते आहेत हे ज्यांच्या मनावर बिंबलेले असते त्यांच्या मनात सदैव भगवंतांचे विचार रुंजी घालत असतात. त्यामुळे मरतानाही त्यांना भगवंतांचे आपोआप स्मरण होऊन त्यांचा उद्धार होतो. ह्या अर्थाचा

अंत-काळी हि माझे चि चित्ती स्मरण राखुनी । देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय ।। 5 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. श्लोकाचे विवरण करताना माऊली म्हणतात, आपण कर्ते आहोत असा जीवाला झालेला अहंकार अधियज्ञामुळे नष्ट होतो. माठ फुटला की, घटाकाश व महदाकाश एकच होतात. त्याप्रमाणे आपला देहही नष्ट होणार व आपला जीवात्मा भगवंतांमध्ये मिसळून जाणार हे निरिच्छ झालेल्यांना माहित असते. त्यामुळे ते नेहमी आत्मरूपाचे चिंतन करत असतात. आत्म्याचे ईश्वराशी मिलन होण्याची चालून आलेली संधी आपल्या हातून निसटू नये म्हणून कायम जागृत असतात. नेमकी हीच गोष्ट इतरांच्या लक्षात आलेली नसल्याने ते सदैव प्रापंचिक गोष्टीत दंग होऊन गेलेले असतात. अधियज्ञ करणाऱ्याला वस्तूस्थितीची जाणीव असते. त्याला प्रापंचिक गोष्टी आध्यात्मिक प्रगती होण्याच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत हे लक्षात आलेले असते. त्यामुळे त्याला प्रापंचिक गोष्टींची आठवणही होत नसते. ज्या गोष्टी माणसाच्या आठवणीत असतात त्यांचेच त्याला आकर्षण वाटत असते. त्यामुळे ज्या गोष्टींचे आकर्षण वाटत नाही त्यासाठी कोणतीही धडपड करायची गरज नाही ह्या निश्चयाने तो स्वस्थ झोपलेला असतो. स्थितप्रज्ञ माणसाचे वर्णन करताना भगवंतांनी गीतेचा दुसऱ्या अध्यायाच्या एकूण सत्तराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात

Advertisement

सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ।। 69।। असे सांगितले आहे. त्याचाही अर्थ असाच आहे. अशाप्रकारे अधियज्ञ करून जो अंतरबाह्य ब्रह्माशी एकरूप होतो त्याला देहाशी काहीच देणेघेणे उरत नाही. असे जरी असले तरी ज्याप्रमाणे खोबरे मिळवण्यासाठी करवंटीला जपावे लागते. त्याप्रमाणे साधना करण्यासाठी देहाला जपावे लागते. एखादी जखम झाल्यावर जखमेचे संरक्षण होऊन वेदना कमी होण्यासाठी त्या जागेवर नैसर्गिकरित्या खपली धरू लागते. जखम पूर्ण बरी झाली की, खपली कधी गळून पडली हे कळतही नाही, त्याप्रमाणे पंचमहाभूतांनी तयार केलेल्या देहाचे काम संपल्यावर देह कधी गळून पडला हे ब्रह्माशी एकरूप झालेल्याच्या लक्षातही येत नाही. मी म्हणजे हा देह नव्हे हे ज्या जीवात्म्याला ठामपणे समजलेले असते त्याला जिवंतपणी त्याचे शरीर कोणकोणते व्यवहार करत असते ह्याचा पत्ता नसतो. मग त्याला शरीराचा नाश होण्याचे भय कसे सतावणार? मी म्हणजे हा देह नसून आत्मस्वरूप आहे ही ज्याची खात्री पटलेली असते तो कशाही प्रसंगी डगमगत नाही. माउलींच्या ह्या सांगण्याची अनुभूती घेतलेले नामदेव महाराज त्यांच्या अभंगातून म्हणतात, देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो  ।।1 ।। चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा  ।।2 ।। वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम  ।।3।। नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ।।4।।

क्रमश:

Advertisement
Tags :

.