परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही
कोल्हापूर :
इयत्ता दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. कारण परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.
कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने कोल्हापूर जिल्हयातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची बैठक विवेकानंद महाविद्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जिल्हास्तरावरून सर्व विभागांची भरारी पथके नेमून अचानक भेटी देणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्हात कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना शाळा प्रमुखांना केल्या.
क्षीरसागर म्हणाले, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी. शाळा स्तरावर उजळणी घेऊन पुरेशा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावर होणारे गैरप्रकार बंद करा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग आयोजित करून कॉपीमुक्तीची शपथ घ्या व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करा. राज्य मंडळांने नव्याने विकसित केलेल्या अॅपविषयी सविस्तर माहिती देऊन शाळाप्रमुख शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचा वेळोवेळी उपयोग करावा. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी प्रास्ताविकात सर्वांना काळानुसार नवीन गोष्टी आत्मसात करा. पीपीटी मिळाल्यावर स्टाफ मिटींग घेवून सर्वांना मार्गदर्शन करा. पीपीटीसह शिक्षक पालक ,विद्यार्थ्यांची बैठक घेवून, त्याचे इतिवृत्त ठेवा, अशा सूचना दिल्या. यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहसचिव बी. एम. किल्लेदार, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, विभागीय शिक्षण मंडळाचे अधिक्षक सुधीर हावळ, एस. वाय. दूधगावकर, एम. जी. दिवेकर, एच. के. शिंदे, आम्रपाल बनसोडे, प्रणाली जमदग्नी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थिती होती.
केंद्रावर गैरप्राकर आढळल्यास कारवाई
सामूहिक कॉपी व पेपरफुटी सारख्या गंभीर प्रकरणी केंद्र शाळेचे अनुदान बंद करणार. शाळा स्वयम् अर्थसहायित करण्यासाठी शिफारस, मंडळाकडून शाळांचे संकेतांक गोठवणे यासारखी गंभीर कारवाई करण्याचाही दिला इशारा.
परीक्षेत नेमून दिलेले काम टाळल्यास होणार कारवाई. शाळेकडे विभागीय मंडळाची कोणतीही थकबाकी असल्यास विद्यार्थी प्रवेशपत्रे रोखणार, पर्यायाने जबाबदारी शाळेवर निश्चित होणार. गैरहजर शाळा प्रमुखांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नोटीस देणार.