सामान्य यूपीआय पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही
एनपीसीआयचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली
बँक खाते ते बँक खात्यावर आधारीत युपीआय पेमेंट किंवा सामान्य पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी बुधवारी सादर केलेल्या एका निवेदनामधून स्पष्ट केले आहे. यावेळी एनपीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे, की विक्रेत्यांच्या ‘प्रीपेमेंट इन्स्ट्रुमेंट’च्या आधारे केलेल्या व्यवहारांवर इंटरचेंज शुल्क आकारण्यात येणार आहे.
कॉर्पोरेशनने पीपीआय वॉलेटला इंटर-ऑपरेबल (इंटरचेंज) युपीआय वातावरणाचा भाग म्हणून मान्यता दिली आहे. आणि पीपीआय द्वारे 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या युपीआय व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती आहे.
यामध्ये फक्त पीपीआय व्यापारी व्यवहारांवर इंटरचेंज शुल्क आकारण्यात येणार असून ग्राहकांच्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच पीपीआयला यूपीआय लिंक केल्यानंतर ग्राहकांना कोणतेही बँक खाते वापरण्याचा पर्याय असेल, तसेच ग्राहक आणि विक्रेते दोघांसाठी बँक खाते ते बँक खाते व्यवहार विनामूल्य राहणार आहेत.