Panhala Nagar Parishad : पन्हाळ्यात गुरूवारी एकही अर्ज नाही
मोकाशी–भोसले युतीची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीने राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुका लागल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. गडावर बैठकांना जोर आला आहे. गुरूवारी चौथ्या दिवशी देखील एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे.
पन्हाळा नगर परिषदेवर १५ वर्षापासून जनसुराज्यशक्ती पक्षाने सत्ता उपभोगली आहे. गतनिवडणुकीत दुरंगी वाटणारी निवडणूक मोकाशी आणि भोसले गटाच्या नगराध्यक्षपदाच्या वादाने तिरंगी बनली. यावेळी तर हे दोन्ही गट एकत्रित येतील, अशी शक्यता असताना ताळमेळ जुळत नाही, असे चित्र आहे.
दरम्यान जनसुराज्यशक्ती पक्षाने या दोन गटांना सोबत समझोता करुन आपली पोळी भाजण्याच्या प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान, या चर्चेतून शहरात समझोता एक्सप्रेस धावली तरी अपक्षाचे स्टेशन याला लागणार आहे. जनसुराज्यने निवडणुकीची तयारी केली असून भोसले आणि मोकाशी गटाने देखील तयारी दर्शवली आहे. दरम्यान या दोन्ही स्थानिक गटांवर निवडणुकीचे चित्र ठरणार असल्याने या दोन्ही गटांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.