भविष्यात कुठल्याही पक्षाशी आघाडी नाही
बसप सर्वेसर्वा मायावती यांची घोषणा
वृत्तसंस्था/ लखनौ
बसप सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीसंबंधी सोशल मीडियावर पोस्ट करत भूमिका मांडली आहे. उत्तरप्रदेश समवेत अन्य राज्यांच्या निवडणुकांमध्ये बसपची मते अन्य पक्षांकडे वळली होती. परंतु संबंधित पक्षांची मते बसपच्या बाजूने वळली नाहीत. संबंधित पक्षांकडे स्वत:ची मते वळविण्याची क्षमता नसल्याने अपेक्षित निवडणूक निकाल प्राप्त झालेला नाही. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी निराशा आणि आंदोलनाला होणारी टाळणे आवश्यक असल्याचे उद्गार मायावती यांनी शुक्रवारी काढले आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यापूर्वी पंजाब निवडणुकीतील कटू अनुभव पाहता प्रादेशिक पक्षांसोबत देखील आता भविष्यात आघाडी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भाजप-रालोआ आणि काँग्रेस-इंडिया आघाडीपासूनही पूर्वीप्रमाणेच अंतर राखले जाणार असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
बसपला कमकुवत करण्याचे प्रयत्न
देशातील एकमात्र प्रतिष्ठित आंबेडकरवादी पक्ष बसप असून त्याचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान चळवळीला सर्वप्रकामे कमकुवत करण्याचे जातीयवादी प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. याचमुळे शासक वर्ग होण्याची प्रकिया पूर्वीप्रमाणेच जारी ठेवणे आवश्यक असल्याचे मायावती यांनी नमूद केले आहे. बसप हा अन्य पक्ष आणि संघटना तसेच त्यांच्या स्वार्थी नेत्यांना जोडण्यासाठी नव्हे तर बहुजन समाजाच्या अनेक हिस्स्यांना परस्पर बंधूभाव आणि सहकार्याच्या बळावर संघटित होत राजकीय शक्तीचे स्वरुप देणे आणि त्यांना शासक वर्ग करण्याचे आंदोलन आहे. याकरता आता अन्यत्र लक्ष विचलित करणे अतिहानिकारक असल्याचे मायावती यांनी नमूद केले आहे.
हरियाणात आयएनएलडीसोबत आघाडी
हरियाणा विधानसभा निवडणुकीत बसपने आयएनएलएडी या पक्षासोबत आघाडी केली होती. या आघाडीला बसपला कुठलाच लाभ झालेला नाही. तसेच आयएनएलडीलाही फारसे यश मिळालेले नाही. आयएनएलडीचे दोन आमदार हरियाणात निवडून आले आहेत. दलित मते आयएनएलडीला बसपमुळे मिळाल्याचा मायावतींचा दावा आहे.