भगवंताच्या नामस्मरणात मोठी ताकद
आमदार भालचंद्र जारकीहोळी : गोकाक येथे अष्टबंध प्रतिष्ठापना : ब्रह्म कलशोत्सवास प्रारंभ
गोकाक : धर्म प्रसार आणि धर्म जागृती ही काळाची गरज आहे. गोकाक शहराची ग्रामदेवी असलेल्या श्री महालक्ष्मी पूजेसाठी सर्वांनी भक्तीपूर्वक सेवा करावी. जप, नामस्मरण करावे. भक्तांनी तन, मन, धनाने सेवा केल्यास त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते. आपले जीवन सार्थकी होण्यासाठी धार्मिक व आध्यात्मिक मार्गाची गरज आहे. तसेच भगवंताच्या नामस्मरणामध्ये मोठी ताकद असल्याचे मत आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केले. गोकाकमध्ये सुरू झालेल्या अष्टबंध प्रतिष्ठापना व ब्रह्म कलशोत्सव कार्यक्रमात रविवारी सायंकाळी महालक्ष्मी मंदिरात नागा देवाची पूजा पार पडली. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या हस्ते नागदेवतेच्या पूजेसह धार्मिक कार्यक्रम पार पडला. देवाचे नावस्मरण केले पाहिजे. आपण भक्तीपूर्ण अभिवादन केले तर ते आपल्याला मिळणारे वरदान आहे. मंत्रांचा नियमित जप मनाला शांती देते, असेही त्यांनी सांगितले.
भक्ती मनापासून केली पाहिजे, त्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, असे मत के. व्ही. राघवेंद्र उपाध्याय यांनी व्यक्त केले. 30 एप्रिल ते 8 मे अखेर विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. दररोज विविध धार्मिक कार्यक्रम भजन, प्रवचन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असून गोकाक शहरातील सर्वच नागरिक भक्तिभावाने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत आहेत. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्यासह युवा नेते सर्वोत्तम जारकीहोळी, सनत जारकीहोळी, अभिषेक नायक, जत्रा महोत्सवाचे सदस्य, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सोमवार दि. 5 रोजी सकाळी 6 वाजता आश्लेषा बळी, नवचंडिका याग, रुद्रयाग प्रसन्न पूजा, सायंकाळी 4 वाजता श्री चक्र पूजा, प्रायश्चित होम, मंडप संस्कार आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.