For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबा घाट परिसरात पोलीस चौकीची नितांत गरज

11:31 AM Sep 08, 2025 IST | Radhika Patil
आंबा घाट परिसरात पोलीस चौकीची नितांत गरज
Advertisement

देवरुख :

Advertisement

घाट माथ्यावर खून करून व्यक्तीचा मृतदेह थेट आंबा घाटात टाकल्याच्या एक ना अनेक घटना घडल्या आहेत. आंबा घाटातील सुमारे १५ ते २० किलोमिटर परिसर निर्जण आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी हद्दीवर पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयांना जोडणारा आंबा घाट हा महत्वाचा मार्ग आहे. हा घाट उंच डोंगर व घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. एका बाजूला उंच कड़ा दर दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी असे चित्र आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या घाटाला महत्व आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे असे नयनरम्य दृष्य घाटात आहे. मात्र या घाटाचा काहींकडून दुरुपयोग केला जात असल्याचे उघड होत आहे. इतर जिल्ह्याच्या भागात विविध कारणांवरून एखाद्या व्यक्तीचा खून करून मृतदेह आंबा घाटात टाकला जात आहे. अशा प्रकारच्या एक ना अनेक घटना घडल्या असून वर्षागणिक यामध्ये वाढ होत असल्याचे दुदैवी चित्र आहे.

Advertisement

रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील दुर्वास पाटील याने भक्ती मयेकर व राकेश जंगम यांचा खून करून मृतदेह आंबा घाटात टाकल्याची ताजी घटना असून दुर्वास याने स्वतः या घटनेची कबुली दिली. मुर्शि चेकपोस्ट पासून आंबा पर्यंत सुमारे १५ ते २० कि. मी. परिसर घनदाट जंगल व निर्जण आहे. याचाचा फायदा उठवत मृतदेह आंबा घाटात टाकले जात आहेत. गेल्या काही वर्षात अनेक मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्याठिकाणी देवरुख पोलीस ठाण्याची हद्द सुरू होते त्याच्या आसपास पोलीस चौकीची अत्यंत गरज आहे.

पोलीस तैनात राहिल्यास गैरकृत्य करणाऱ्याच्या मनात भीती निर्माण होईल. तसेच खून प्रकरणाच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे. वास्तविक किरबेट, देवडे, भोवडे, साखरपा, कोंडगाव आदी गावांतील ग्रामस्थांना तत्काळ मदत मिळावी, त्यांची फरपड होऊ नये, जवळच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी साखरपा दुरक्षेत्राची निर्मिती झाली आहे. आंबा घाटात एखादे गैरकृत्य करून कळकदरा-निनावे-खडीकोळवण- खडीओझरे-बामणोली मार्गे मारळला पोबारा करू शकतो. या साऱ्याचा विचार करता आंबा घाटात पोलीस चौकी होणे अत्यंत आवश्यक आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा न करता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यावर वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पोलीस विभागात अनेक पदे रिक्त आहेत. मुळात पदे रिक्त, यातच कामाचा वाढता व्याप यामुळे कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाची मात्र कारभार हाकताना दमछाक होत आहे. यातूनही काहीतरी मार्ग काढून, तारेवरची कसरत वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावी लागणार असल्याचेही सत्य नाकारता येत नाही.

Advertisement
Tags :

.