For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावगाव ग्रामस्थांनीदेखील निर्णायक पाऊल उचलण्याची गरज

11:45 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावगाव ग्रामस्थांनीदेखील निर्णायक पाऊल उचलण्याची गरज
Advertisement

धरण भागात पार्ट्यांसह प्रेमीयुगुलांचा वावर वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त

Advertisement

बेळगाव : राकसकोप जलाशय परिसरात पार्ट्यां करण्यास ग्रामस्थांनी विरोध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल आहे. त्याचप्रमाणे सावगाव ग्रामस्थांनीही अशाप्रकारचे ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कारण शहरापासून लगत असलेल्या सावगाव धरण परिसरात पार्ट्यां करण्यासह प्रेमीयुगुलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे वारंवार अप्रिय घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसर निसर्गरम्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ओल्या पार्ट्यां करण्यासह प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. पार्ट्यां करून प्लास्टिक व केरकचरा तेथेच टाकण्यासह दारुच्या बाटल्या फोडल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा सर्व प्रकार बंद व्हावा यासाठी धरण परिसरात पार्ट्यां करण्यास विरोध करण्याचा निर्णय नुकताच ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सावगाव धरण परिसरात नशेबाज तरुणांचा अधिक वावर

Advertisement

शहरापासून काही अंतरावर असलेल्या सावगाव धरण परिसरात गेल्या काही वर्षांपासून नशेबाज तरुणांचा वावर वाढला आहे. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत पार्ट्यांचे आयोजन करून धिंगाणा घालण्याचे प्रकार सुरु आहेत. विशेष करून रविवारच्या दिवशी पार्ट्यांचे प्रमाण अधिक असते. नशेबाज तरुणांकडून आरडाओरड करण्याचे प्रकारही सुरू आहेत. त्यामुळे शेताकडे एकट्या-दुकट्या जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून सदर प्रकारांवर आळा घालण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस पोलिसांनी गस्त वाढविली होती. पण आता पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नशेबाज तरुणांसह प्रेमीयुगुलांचा वापर वाढला असला तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रेमीयुगुलांना फिरण्यास निर्बंध घाला

धरण परिसरात पार्टी करणाऱ्यासह प्रेमीयुगुलांना फिरण्यास निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. संबंधितांना अद्दल घडविल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही असे मत तरुणांतून व्यक्त केले जात आहे. यासाठी पंचकमिटीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

जोखीम पत्करुन ये-जा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

अलिकडेच विजयनगर येथील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला होता. धरण परिसरात ग्रामस्थ जनावरे चरावयास घेऊन जातात मात्र तरुणांचा वावर वाढला असल्याने जनावर मालकांची डोकेदुखीदेखील वाढली आहे. धरणाच्या सभोवताली बाटल्यांचा खच पडला असून शेतकऱ्यांना जोखीम पत्करत ये-जा करण्याची वेळ आली आहे. पोलीस खात्याकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता राकसकोपप्रमाणेच सावगाव ग्रामस्थांनीदेखील निर्णायक पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.