जपानमध्ये आता अतिवृष्टी अन् भूस्खलनाचा धोका
वृत्तसंस्था/ जपान
नव्या वर्षाच्या पहिल्या दिनी जपानमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपातील बळींची संख्या आता 62 वर पोहोचली आहे. जपानमध्ये 7.6 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का सोमवारी दुपारी बसला होता, यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. याचदरम्यान जपानमध्ये मदत तसेच बचावकार्य सुरू असून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भूकंपामुळे झालेल्या हानीनंतर काही किनारी क्षेत्रांमधील रहिवाशांना उंच स्थानांवर स्थलांतर करावे लागले आहे.
भूकंपप्रभावित भागांमध्ये आता अतिवृष्टी होण्याचा अनुमान असल्याने भूस्खलनाचा धोका वाढला आहे. जपानमध्ये खचलेले रस्ते, पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान आणि सर्वाधिक प्रभावित क्षेत्रे दुर्गमस्थानी असल्याने बचाव अन् मदतकार्यात अडथळे निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
लोकांना वीज अन् पाण्यासमवेत अन्य मूलभूत सुविधा प्राप्त होतील हे सरकारने सुनिश्चित करावे असे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी म्हटले आहे. लोकांना वाचविण्यासाठी शक्य ते सर्व काही करावे, ही काळाविरोधातील एक लढाई असल्याचे लक्षात ठेवावे असे किशिदा यांनी एका तातडीच्या बैठकीला उद्देशून म्हटले आहे. आपत्तीतून वाचलेले लोक काही काळासाठी घरापासून लांब राहू शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.