For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रविवारच्या ग्रामसभेत गोंधळ होण्याची शक्यता

12:31 PM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
रविवारच्या ग्रामसभेत गोंधळ होण्याची शक्यता
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना सूचना : छत्रपतींचा अपमान न करण्याचे शिवप्रेमींचे आवाहन

Advertisement

मडगाव : पाद्रीभाट-सां जुझे दी आरियाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर येथील परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे. त्यातच स्थानिक ग्रामपंचायतीने या संवेदनशील विषयावरुन विशेष ग्रामसभा बोलविल्याने वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळण्यासंबंधीच्या सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काल गुरुवारी काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चात वेळळी मतदारसंघाचे आमदार व्रुझ सिल्वा, प्रतिमा कुतिन्हो, काँग्रेसचे सांवियो डिकॉस्ता इत्यादी सहभागी झाले होते. मेणबत्ती मोर्चापूर्वी ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवजयंतीच्या पूर्व संध्येला सां जुझे दी आरियाल येथे खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळा बसविण्यासाठी मातीचा भराव टाकून रस्ता केला जात असल्याने स्थानिकांनी हरकत घेतली होती. त्यामुळे या भागात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली.

 मंत्र्यांनी दाखविला संयम

Advertisement

शिवजयंतीच्या दिवशी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुतळ्याचे उद्घाटन केले आणि ते आपल्या कारजवळ जात असताना वाटेत त्यांना रोखण्यात आले. त्याचवेळी काही जणांनी दगडमाती त्यांच्यावर फेकली होती. त्याही परिस्थितीत मंत्री फळदेसाई यांनी संयम बाळगला होता. दुसऱ्या दिवशी मंत्र्यांवर दगडमाती फेकणाऱ्या 20 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पत्रकार परिषदेतून केली. आता रविवार याच विषयावर विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे.

ग्रामसभेत गोंधळ होण्याची शक्यता

रविवारी सां जुझे दी आरियाल पंचायतीची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. या ग्रामसभेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे समर्थन करणारे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तशी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुतळ्याचे समर्थक व विरोध ग्रामसभेत आमने-सामने उभे ठाकले तर प्रचंड गदारोळ माजण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विशेष ग्रामसभा रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून तसा आदेश निघू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना सूचना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन धर्मांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले असून सां जुझे दी आरियालमधील प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळण्यासंबंधी उपजिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दोन हात करण्यास सज्ज

केपे येथे शिवप्रेमींनी सां जुझे दी आरियाल येथे खासगी जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे समर्थन केले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणे चुकीचे आहे. मुद्दामहून कोण तरी धार्मिक कलह निर्माण करीत असल्याचा आरोपही शिवप्रेमींनी केला आहे. जर गरज भासली तरी आम्ही दोन हात करण्यास सज्ज असल्याचा इशारा ही शिवप्रेमींनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे प्रतिनिधी : सुभाष वेलिंगकर

सां जुझे दी आरियाल येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच जागी राहिला पाहिजे असे मत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माचे नव्हे तर राष्ट्राचे प्रतिनिधी आहेत हे लक्षात ठेवावे. ख्रिश्चन बंधू तसेच चर्च, फादरने सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. वेलिंगकर म्हणाले काही जणांना राष्ट्र लागत नाही आणि राष्ट्रीय तत्वे देखील मान्य नाहीत. गोव्यातील ख्रिस्ती सुजाण आणि सुशिक्षित बांधवांनी राष्ट्रवाद समजून घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म लागत नव्हता तर ते राष्ट्रीय महाराज आहेत हे लक्षात ठेवावे. ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला तो एका खाजगी जागेमध्ये आहे. जागेच्या मालकाने स्वत:ची जागा पुतळ्यासाठी बहाल केलेली आहे. त्यामुळे या पुतळ्याला कोणी आक्षेप घेऊन शकत नाही. तो मुळीच बेकायदेशीर ठरत नाही, याउलट या पुतळ्यापासून काही अंतरावर एक बेकायदेशीर खुरीस उभारण्यात आलेला आहे. त्याचे एका छोट्या चर्चमध्ये रूपांतर करू पाहत आहेत. त्यामुळेच शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्यांच्यासाठी व्यत्यय ठरत असावा. राज्यात सर्व ठिकाणी जातीय सलोखा राहावा. असे आमचे नेहमीच प्रयत्न असतात. सर्वांनी त्यास सहकार्य करावे, त्याचबरोबर नियोजित ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात शिवसमर्थक उपस्थित राहणार असल्याचा गर्भित इशारा वेलिंगकर यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.