साहित्य संमेलनात वाद-प्रतिवाद हवा; विसंवाद नको
मुख्यमंत्र्यांचे मत, मराठी माणूस कलहप्रिय असल्याचीही कोटी, विश्व मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
सुकृत मोकाशी / पु.ल.देशपांडे साहित्यनगरी, पुणे
साहित्य संमेलन असो वा नाट्यासंमेलन. तिथे वाद निर्माण झाला नाही, तर ते संमेलनच असू शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. कारण आपण संवेदनशील, भावनाप्रधान लोक आहोत. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होत असते. मात्र, वाद-प्रतिवाद होत असताना विसंवाद होता कामा नये, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, भाषा मंत्री उदय सामंत, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, बापू पठारे, समन्वयक राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, उषा तांबे, मनीषा म्हैसकर आदी या वेळी उपस्थित होते. मधु मंगेश कर्णिक यांना ‘विश्व मराठी साहित्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
फडणवीस म्हणाले, संमेलानांमध्ये वाद हे होतच असतात. पण, त्यामध्ये विसंवाद होऊ नये. वाद होतात म्हणून संमेलने आयोजित करण्याचे थांबवू नये. अशा संमेलनातूनच चांगले काम करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते. वादाबाबत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठव्या शतकातील एका पुस्तकाचाही दाखला दिला. ज्यात मराठी माणसाचे गुण आणि अवगुण याबाबत माहिती दिलेली आहे. मराठी माणूस हा कलहशील असल्याचे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे.
एआय तंत्रज्ञानाला घाबरून चालणार नाही. त्याचा उपयोग प्रचारासाठी केला पाहिजे. त्यातून भाषा परावर्तित झाली पाहिजे. या तंत्रज्ञानाचा स्मॉल लँग्वेज भाषा निर्माण करून पुढील पिढीपर्यंत अभिजात साहित्य कसे पोहचवता येईल, हे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. जगभरात असा एकही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. कोणत्याही देशात आम्ही दौऱ्यासाठी गेलो, तरी तिथे स्वागतासाठी मराठी माणसे लांबून येतात. हे बघून अतिशय आनंद वाटतो. मराठी भाषा प्राचीन होतीच. पण, भाषेला राजमान्यता मिळणे आवश्यक असते, असेही त्यांनी नमूद केले.
‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य पिच्छाच सोडत नाही.
‘मी पुन्हा येईन’ हे वाक्मय आता माझा पिच्छाच सोडत नाही. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे वाक्मय म्हणतात. मागच्या काळात हे उपहासाने म्हटले जायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ बदलत असतात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे म्हटले पाहिजे, अशी टिप्पणीही फडणवीस यावेळी केली.
मराठी माणसाच्या पाठीशी भक्कम
या संमेलनाला बेळगाव, निपाणीहूनही कवी आले आहेत. मराठी माणसाच्या पाठीशी भक्कम असल्याची भावना यातून दिसते, असे सांगत मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी साहित्याचे सर्व प्रकार हाताळत मराठी भाषा समृद्ध केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या वेळी काढले.
मालगुंड आता पुस्तकांचे गाव होणार : उदय सामंत यांची घोषणा
उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीतील केशवसुतांच्या मालगुंड गावाला पुढील वर्षी ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. ज्या गावात मराठी भाषेला ताकद देणारी व्यक्ती जन्माला आली असेल, त्या गावाला पुस्तकाचे गाव करण्याचा आमचा मानस आहे. काही लोक मराठीला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. त्याबाबत कडक कायदा झाला पाहिजे. युवा पिढीने मराठी अस्मिता जपण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली.