फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये गुंतवणूकीकडे वाढला कल
स्मॉल, मिडकॅपपेक्षा फ्लेक्सी प्रकारात गुंतवणूक अधिक : 5542 कोटीची गुंतवणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बाजारातील बदलाच्या पार्श्वभूमीवर स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंड तसेच लार्ज कॅप सारख्या फंडांमध्ये गुंतवणुकीचा कल वाढताना दिसतो आहे. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत फ्लेक्सिकॅप फंडामध्ये गुंतवणूकदारांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यामध्ये सुद्धा थिमॅटिक श्रेणीतील गुंतवणूक वगळता इतर गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांचा रस अधिक राहिला आहे.
एप्रिलमध्ये फ्लेक्सिकॅप फंडांमध्ये 5542 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. स्मॉलकॅप फंडापेक्षाही गुंतवणूक जवळपास 39 टक्के अधिक आहे. स्मॉल कॅप फंडांमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तुलनात्मकदृष्ट्या पाहता कमी जोखीम म्हणून फ्लेक्सिकॅप आणि लार्ज कॅप फंडांचा विचार केला जातो आहे. गेल्या 4 महिन्यांमध्ये पाहता स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंडांपेक्षा फ्लेक्सि कॅप व लार्जकॅप फंडांमध्ये गुंतवणूक जास्त करुन वाढलेली आहे. एप्रिल महिन्यात फ्लेक्सिकॅप फंड करिता नवीन 3 लाख खाती उघडली गेली आहेत. स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंडाकरिता अनुक्रमे 1 लाख 31 हजार 100 आणि 2 लाख 16 हजार 556 नवी खाती उघडली गेली आहेत.
गुंतवणूक बदलाचे कारण
शेअर बाजारमध्ये घसरणीचा कल असताना गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीमध्ये बदल केला आहे. लार्ज कॅप आणि फ्लेक्सिकॅप फंडांमध्ये एसआयपीच्या (सिस्टमेटीक इन्वेस्टमेंट प्लान)माध्यमातून मिळणारा परतावा हा मिडकॅप आणि स्मॉलकॅपंपेक्षा चांगला मिळतो आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंडांमध्ये घसरणीने फ्लेक्सिकॅपमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याबाबत रुची वाटतेय.