पावसाची रिपरिप सुरूच असल्याने हवेत गारठा
बटाटे, रताळी काढणीत व्यत्यय : दांडिया-गरबा खेळणाऱ्यांमध्ये नाराजी
बेळगाव : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (दि. 29) शहर व उपनगरांत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात सकाळपासून ऊन तर काही भागात ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. रविवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. सोमवारी सकाळी काही वेळ ऊन असल्याने नागरिक घराबाहेर पडले होते. शहर व ग्रामीण भागात काही ठिकाणी मोठा पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. गेल्या शुक्रवारी व शनिवारी पावसाने शहर व ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले होते.
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राबरोबर सीमाभागातही पुराची स्थिती येते की काय असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. सोमवारी सकाळपासून काही प्रमाणत ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारनंतर पावसाच्या सरी येत राहिल्याने शहरातील व्यवहार व ग्रामीण भागातील शेतीची कामे खोळंबली. हा पाऊस भात पिकाला उपयुक्त असला तरी सध्या रताळी व बटाटा पिके काढण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. सततच्या पावसामुळे बटाटा पीक कुजण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. सध्या नवरात्रीनिमित्त सायंकाळपासून ठिकठिकाणी दांडिया व गरबा कार्यक्रम सुरू आहेत. अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे कार्यक्रमात व्यत्यय येत आहे. तरीही तरुण-तरुणी दांडिया व गरबामध्ये हौसेने सहभागी होत आहेत.