ईश्वराप्रती जाण्याचे ज्ञान आणि कर्म असे दोन मार्ग आहेत
अध्याय तिसरा
अर्जुन देवांना म्हणाला, बुद्धी कर्माहून श्रेष्ठ आहे असे आपण म्हणता आणि मला युद्ध करायला सांगता ह्या आपल्या ह्या घोटाळ्यात टाकणाऱ्या, दुट्टपी वचनामुळे माझ्या बुद्धीला भ्रम झाला आहे. तरी जे केल्याने माझे हित होईल असे एक निश्चित काय ते सांगा. आधीच मला काही समजेनासे झाले आहे, त्यात मी या मोहाच्या चक्रात अडकलो आहे, म्हणून महाराज, तुमचे म्हणणे मला समजेल असे सोपे करून सांगा. अहो महाराज, सर्वोकृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ असलेल्या देवा, लहान मुलाला स्तनपान करण्यास आईसाठी कोणतीच वेळ ही अवेळ नसते, त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, माझ्या मनातील भ्रम दूर करण्यासाठी आता काळवेळ बघू नका. परलोकात कल्याणकारक आणि इहलोकामध्ये आचरण करण्यास उचित अशी एक निश्चित गोष्ट मला सांगा. अर्जुनाच्या शंकेला भगवंत पुढील श्लोकापासून उत्तर देणार आहेत. ते म्हणाले, पूर्वी मी दोन प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग ज्ञानयोगाच्या आधारे चालणाऱ्या आत्मज्ञानी सांख्याचा असून दुसरा मार्ग निरपेक्ष कर्मयोगाच्या आचरणाच्या आधारे कर्म करणाऱ्यांचा आहे.
दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे । ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया ।।3।।
अर्जुनाचा उडालेला गोंधळ भगवंताच्या लक्षात आला. कर्मापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ हे खरे पण शास्त्रात सांगितल्यानुसार कर्म केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही हे तत्व ते आता अर्जुनाला समजावून सांगत आहेत. अर्जुनाच्या शंकेचे समाधान करण्यासाठी ते बोलू लागले. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना! आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला. निष्काम कर्मयोग म्हंटले, म्हणून तुला व्यर्थ राग आला आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्हीही मार्ग मीच सांगितले आहेत. हे विरश्रेष्ठा अर्जुना हे दोन्ही मार्ग अनादि काळापासून आहेत आणि हे माझ्यापासूनच प्रकट झालेले आहेत. या पैकी ज्ञानयोगाचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मतत्वाची जाणीव होऊन तद्रुपता प्राप्त होते. दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोग होय. कर्ममार्गाचे लोक समत्वभाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि काही काळाने त्यांनाही मोक्ष प्राप्त होतो. असे हे दोन वेगवेगळे मार्ग असले, तरी ते एकाच चैतन्याच्या ठिकाणी एकरूप होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार होणाऱ्या अशा दोन्ही पदार्थात सारखीच तृप्ती असते किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळ्या दिसतात, पण समुद्रात मिळाल्या असता त्या एकच होतात त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे जरी दोन मार्ग असले, तरी त्यांचे साध्य एकच असते. परंतु कोणता मार्ग निवडायचा हे त्या मार्गावरून चालणाऱ्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. ज्याला जो मार्ग झेपेल तोच त्याने निवडावा. योगी त्याच्या तपस्येच्या जोरावर जलद गतीचा ज्ञानमार्ग निवडतो तर कर्मयोगी हळूहळू ध्येयाकडे नेणाऱ्या कर्मयोगाच्या मार्गाने पुढे जातो. योग्याचा मार्ग हा विहंगम मार्ग असतो तर कर्मयोगी पिपलिका म्हणजे मुंगीच्या चालीने हळूहळू पुढे सरकतो. एखादा पक्षी उडतो आणि लगेच फळाला बिलगतो पण पक्षाप्रमाणे मनुष्य करू शकत नाही. सर्वसामान्य मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असे करत करत हळूहळू वर जात असतो आणि कांही वेळाने पण त्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो. त्याप्रमाणे सुरवातीला कर्ममार्गानुसार आचरण करून पुढे ज्ञानमार्गाने वाटचाल करावी.
क्रमश: