हलशी-बेकवाड रस्त्यावर खड्डेच खड्डे
रस्त्यावरुन वाहतूक करणे बनले धोकादायक : रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्याची मागणी
► वार्ताहर / हलशी
हलशी-बेकवाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता तात्पुरता दुरुस्त करावा, अशी मागणी हलशी, बिडी, बेकवाड भागातील नागरिकांतून होत आहे.
हलशी-बेकवाड हा कमी अंतराचा रस्ता असल्याने या रस्त्यावरुन आसपासच्या गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने यातून दुचाकी चालविणे त्याचबरोबर चालत जातानाही धोका निर्माण होत आहे.
आमदार फंडातून निधी मंजूर करण्याची मागणी
या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारक जीवमुठीत घेऊन ये-जा करत आहेत. आजूबाजूच्या नरसेवाडी, भुत्तेवाडी, सागरे, नंजिनकोडल या गावात कोणी आजारी पडल्यास हलशीला डॉक्टरकडे आणणे कसरतीचे झाले आहे. हलशी हे पर्यटनस्थळ असून या रस्त्यावरून दररोज हजारो पर्यटक ये-जा करत असतात. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हा रस्ता तात्पुरता दुरुस्त करून वाहतुकीस सुरळीत करावा. तसेच आमदार फंडातून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.