For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या नवरा- बायकोच्या डोक्यात फक्त दगड-धोंडे !

11:11 AM May 19, 2025 IST | Radhika Patil
या नवरा  बायकोच्या डोक्यात फक्त दगड धोंडे
Advertisement

कोल्हापूर  / सुधाकर काशीद : 

Advertisement

कोणी दागिन्याचा संग्रह करतो, कोणी वेगवेगळ्dया वस्तूंचा संग्रह करतो, कोणी नाण्यांचा, नोटांचा करतो, पण कोल्हापुरातील नवरा-बायकोच्या एका जोडीचा संग्रह खूप म्हणजे खूप वेगळा आहे आणि हा संग्रह चक्क आपल्या अवतीभवती असलेल्या दगड-धोंड्यांचा आहे. दगड-धोंडे म्हणजे त्याला एवढं काय मूल्य? असा विचार साहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनाला चाटून जातो. पण या नवरा बायकोच्या दृष्टीने दगड-धोंड्याचा हा संग्रह केवळ अमूल्य आणि अमूल्य असाच आहे

हा संग्रह कोल्हापूर परिसरातील साऱ्या भूगर्भाचा वेध घेणारा आहे आणि हा वेध म्हणजे एक नव्हे, दोन नव्हे, शेकडो नव्हे, हजारो नव्हे, पण कोटी वर्षांपूर्वीचा आहे. कोल्हापूरच्या भूगर्भात काय, काय दडून राहिले आहे, याचा हा अस्सल पुरावा या नवरा-बायकोनी संग्रहित केला आहे. एखाद्याचे काहीतरी चुकले तर आपण सहजच म्हणतो, की तुझ्या डोक्यात काय दगड भरले आहेत काय? म्हणजेच बुद्धीचा आणि तुझ्या डोक्याचा काय संबंध आहे, असेच आपण अनेकवेळा सहजपणे म्हणून जातो. दगड-धोंडे म्हणजे त्याला काही किंमत नाही, असेच आपण त्यातून व्यक्त होत असतो. पण या नवरा-बायकोच्या डोक्यात खरोखरच फक्त दगड-धोंडे भरले आहेत आणि त्यांचा संग्रह म्हणजे दगड- धोंड्यांचे निसर्ग पर्यावरणाशी असलेले नाते स्पष्ट करणारे आहे आणि त्यामुळेच, ‘होय, आमच्या डोक्यात दगड-धोंडेच भरले आहेत,’ असा या जोडीचा अभिमानपूर्वक दावाही आहे.

Advertisement

प्रा. अभिजीत पाटील आणि प्रा. योगिता पाटील अशी ही दगड-धोंड्यांचा संग्रह करणारी जोडी आहे. अभिजीत हे विवेकानंद महाविद्यालयात आणि योगिता या गोखले कॉलेजमध्ये जीओलॉजीच्या प्राध्यापक आहेत. दगड, धोंडे, माती, डोंगर, टेकड्या व त्याचे अंतरंग हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. दगड किंवा भूगर्भातील दगडाचे थर याचा कोल्हापूर जिह्याच्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या मते कोल्हापूर जिह्यातील आजरा परिसरातील भूगर्भात असलेला दगड खूप म्हणजे खूप जुना आहे. उर्वरित जिह्यात बेसॉल्टचा थर आहे. हा दगड बांधकाम, मूर्तीसाठी वापरला जातो.

चंदगड, आजरा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड परिसरात लेटराईटचा दगड आहे, त्यात बॉक्साईट आहे. दगडाचे थर एकमेकावर कसे तयार होतात, याचे स्वरूप कोल्हापूर जिह्यात अगदी डोळ्यांनी सहज दिसून येते. अशा डोंगर कपाऱ्या आहेत. जोतिबा डोंगरावर सहा ते सात थर दिसतात. पन्हाळ्यावर जकात नाक्यासमोर आठ ते नऊ थर दिसतात. गिरगावला दहा ते अकरा थर दिसतात. पश्चिमेकडील घाट मार्गात हे थर कड्याच्या बाजूला अगदी सहज दिसतात. या थरात लाल मातीचा एक बारीक थर दिसतो. ती लाल माती म्हणजेच काव हा रंगकामात उपयोगी असलेला घटक आहे. स्तंभरचनेचे दगडी स्तंभ, ज्योतिबा पन्हाळा तुमजाई डोंगर, बांदिवडे, मसाई पठार येथे अगदी सहज अभ्यासता येतात. दगड-धोंड्याचे हे अंतरंग खूप वेगळे आहेत. त्यात खूप वेगवेगळी खनिजे आहेत. खडक रूपांतराच्या रचना आहेत, जिओलॉजीच्या अभ्यासात त्याचा समावेश आहे.

कोट्यावधी वर्षापासून घडलेला इतिहास त्यात दडलेला आहे. दूधगंगा राधानगरी परिसरात वाळूकामय दगड आढळतो. अर्थात भूगर्भातले सर्व संशोधन अद्याप पूर्ण झालेले नाही . ते जेव्हा होईल तेव्हा भूगर्भाचे अंतरंग अधिकच वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी उघड होतील. पण या अभ्यासाच्या निमित्ताने अभिजीत पाटील, योगिता पाटील या नवरा-बायकोनी एक दगड-धोंड्यांचा संग्रह केला आहे आणि काही काळानंतर या संग्रहात भरच पडत जाणार आहे. वर वर साधा दिसणारा दगड किती प्राचीन आहे, किती अति प्राचीन आहे, किती मोलाचा आहे, याची माहिती म्हणजे कोल्हापूर परिसरातील भूगर्भाचे अंतरंग खुले करणारी आहे. त्यामुळे नवरा-बायकोची ही जोडी दगड-धोंड्यांच्या सहवासात आहे. सारे गाव त्यांना म्हणते, यांच्या डोक्यात दगड-धोंडेच भरलेले आहेत. आणि होय, आमच्या डोक्यात दगड-धोंडेच भरले आहेत, असं म्हणताना या जोडीला विशेष अभिमान आहे.

Advertisement
Tags :

.