पावसामुळे पिकांची नासाडी झाल्याची एकही तक्रार नाही
पणजी : यंदा पावसामुळे शेती-भाजीची किंवा पिकांची नासाडी झाली म्हणून एकही तक्रार आणि भरपाईचे दावे आले नसल्याची माहिती कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली आहे. गेल्यावर्षी मात्र अनेक तक्रारी, दावे आले होते, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या नुकसान भरपाई योजनेनुसार प्रति हेक्टरमागे रु. 40,000 पर्यतची भरपाई दिली जाते. त्यासाठी योग्य तो अहवाल-पंचनामा देण्याची गरज असते. विभागीय कृषी कार्यालयाने (तालुका स्तरीय) ते काम करायचे असते. त्याशिवाय नुकसान भरपाईचे दावे मान्य केले जात नाहीत. असे ते म्हणाले. शेतकरीवर्गाने नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने विभागीय कृषी कार्यालयात देणे आवश्यक असते. त्यास उशीर झाल्यास किंवा केल्यास आर्थिक मदत मिळण्यास उशीर होतो म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचे नुकसानीचे अर्ज लवकरात लवकर सादर करावेत असे त्यांनी सांगितले. यंदा फारशा नुकसानीच्या भरपाईच्या तक्रारी नसल्यामुळे विविध पिकांसाठी हंगाम चांगला असल्याचे दिसून येते. पाऊस सर्वसाधारण आणि राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात असल्याने शेती, भाजी किंवा इतर पिके चांगली होण्याची शक्यता कृषी खात्याने वर्तवली आहे.