For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संयमी करत असलेल्या यज्ञांची अनेक नावे आहेत

06:30 AM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
संयमी करत असलेल्या यज्ञांची अनेक नावे आहेत
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, काही योगी ज्ञानेन्द्राrयांना त्यांच्या ताब्यात ठेवतात. त्यासाठी ते त्यांच्या इच्छांची आहुती इंद्रियरुपी अग्नीत देत असतात. ते जरी निरिच्छ झाले असले तरी लोकांचे कल्याण करण्यासाठी ते इंद्रियांचा उपयोग करून घेतात. धारणा-ध्यान-संयम हेच योग्यांचे अग्निहोत्र असते. इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघाली की, कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी इंद्रियरूपी कुंडातून निघालेल्या पवित्र अग्नीमध्ये आशारूप धूर नाहीसा होतो.

यज्ञ करण्याची निरनिराळी कारणे सांगताना भगवंत म्हणाले, देवतांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घ्यायचे म्हणून कोणी यज्ञ करतात. योगी यज्ञाच्या माध्यमातून आत्मसुखाच्या इच्छेने दैवतांची रात्रंदिवस उपासना करतात. ज्याला देहाच्या पोषणाविषयी चिंता वाटत नाही तो ह्या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज. आता दुसरा प्रकार तुला सांगतो. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. काही योगी ध्यान, धारणा, समाधी ह्या माध्यमातून योगाभ्यास करत असतात.

Advertisement

त्याबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, योगी ज्ञानेन्द्राrयांना त्यांच्या ताब्यात ठेवतात. जेणेकरून इंद्रिये काय सुचवताहेत ते न करता त्यांना हवे ते इंद्रियांकडून करून घेतात. त्यासाठी ते विषयांची म्हणजे त्यांच्या इच्छांची आहुती इंद्रियरुपी अग्नीत देत असतात. माणसाच्या इच्छाच नाहीशा झाल्या तर ज्ञानेन्द्राrयांना काही कामच उरत नाही. जेव्हा योग्याला काही माहिती हवी असेल तेव्हढ्यापुरती ती कार्यरत होतात आणि इतरवेळी स्वस्थ बसतात. इच्छांची आहुती इंद्रियरुपी अग्नीत देणाऱ्या योग्यांच्याबाबतीत सांगितल्यावर पुढील श्लोकात भगवंत सांगतात, काही योगी संयमाच्या अग्नीत इंद्रिये आणि प्राण अर्पण करून टाकतात.

प्राणेंद्रिय-क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती । चिंतनाने समाधीस अंतरी चेतवूनिया ।।27 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आत्मज्ञानाच्या अग्नीने योग्याच्या दोषांचे क्षालन होते. योगी विवेकाची रवी करतात. ती रवी हृदयात शांतीने बळकट धरून सात्विक धैर्याने दाबून गुरूपदेशरूपी दोर लाऊन ओढतात. याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होऊन ज्ञानाग्नी प्रकट होतो. त्यामुळे प्रथम ऋद्धिसिद्धीच्या मोहाचा धूर नाहीसा होतो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. निर्विचार मनाचे इंधन त्या ज्ञानरूपी ठिणगीला घालतात. त्यामुळे ज्ञानाच्या ज्वाला प्रदीप्त होतात. त्या ज्वालेमध्ये नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जळतात. असा यज्ञ करणारा पुरुष अहं ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या ज्ञानाग्नीत इंद्रियकर्मांच्या आहुती देतो. संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्यांचे हवन करून जे शिल्लक राहते ते आत्मज्ञानाचे सुख असते, त्याचे तो सेवन करतो. अशा या निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांनी साधक माया मोहाचे पारिपत्य करतात. त्यामुळे त्यांना ईश्वर स्वरूपाचे कायम स्मरण राहते. असे करून कित्येकजण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांना मोक्ष हे एकच फळ मिळते. संयमी करत असलेल्या यज्ञांना अनेक नावे आहेत. यज्ञ करण्याचे मूळ उद्दिष्ट त्याग करण्याचे असते. यज्ञ कोणत्याही प्रकारचा असला तरी सर्व इच्छांचा त्याग करून निर्विचार होणे हे यज्ञकर्त्याचे ध्येय असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.