12 तास आहेत, पत्नी-मुलांना वाचव!
प्रथम इराणी अधिकाऱ्यांना करायचा फोन, मग इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला
इराण विरोधात इस्रायलने ऑपरेशन रायजिंग लायनसोबत आणखी एक गुप्त मोहीम सुरू केली होती. याच्या अंतर्गत इस्रायली गुप्तचर यंत्रणेने इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत धमकाविण्याचे कृत्य सुरू केले होते.
या गुप्त मोहिमेशी संबंधित तीन जण आणि एका रेकॉर्डिंगद्वारे माहिती मिळाली आहे. इराणी सैन्याधिकाऱ्यांना धमकीयुक्त कॉलमागे उद्देश इराणी शासनाला अस्थिर करणे होता.
पर्शियन भाषेत धमकी
इस्रायलच्या सुरक्षा सेवेसाठी काम करणाऱ्या पर्शियन भाषेच्या तज्ञांकडून इराणी अधिकाऱ्यांना फोन करविण्यात आले होत. जर तुम्ही अयातुल्ला अली खामेनेई यांना समर्थन देणे बंद केले नाही तर तुम्हालाही लक्ष्य करण्यात येईल असे या अधिकाऱ्यांना सांगण्यात येत होते. अशाप्रकारे सुमारे 20 अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा अनुमान आहे.
पलायनासाठी 12 तास
एका रेकॉर्डिंगमध्ये इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्याला एका वरिष्ठ इराणी जनरलशी बोलताना ऐकले गेले आहे. मी तुम्हाला आताच सल्ला देतोय,तुमच्याकडे पत्नी आणि मुलांसोबत पलायन करण्यासाठी 12 तास आहेत. अन्यथा तुम्ही देखली आमच्या यादीत आहात. आम्ही कल्पनेपेक्षाही तुमच्या नजीक आहोत, हे विसरू नका, पुढील काळात देवच तुमचे रक्षण करो’ असे हा अधिकारी इराणी अधिकाऱ्याला सांगत असल्याचे रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येते.
अनेक इराणी सैन्याधिकारी लक्ष्य
इस्रायली गुप्तचर यंत्रणेने कॉल केलेले बहुतांश इराणी अधिकारी जिवंत राहू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे फोन कॉल्स इराणच्या आण्विक केंद्र, शस्त्रनिर्मिती प्रकल्प आणि क्षेपणास्त्र लाँचर्सवर सैन्य हल्ल्यांसोबत इराण विरोधात एका मोठ्या गुप्त कारवाई अभियानाचा हिस्सा होते असे इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वाघेरी, सलामीसारखी अवस्था करू
इारणवर हल्ल्याच्या प्रारंभिक तासांमध्ये आयडीएफने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर मेजर जनरल होसैन सलामी आणि इराणी सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बाघेरी समवेत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार करण्यात आले होते. यानंतर एका फोन कॉलमध्ये इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्यांनी या हत्यांचा दाखला देत अन्य वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांना कॉल केला आणि ‘दोन तासांपूर्वी बाघेरी, सलामी, शमखानी यांना एक-एक करून नरकात पाठविणाऱ्या देशातून मी बोलतोय’ असे सांगितले होते.
भीती निर्माण करणे होता उद्देश
या गुप्त अभियानाचा उद्देश इराणच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या स्तरावरील नेतृत्वाला भयभीत करणे होता. इस्रायली हल्ल्यांच्या प्रारंभिक काळात प्रभावित न झालेल्या आणि खामेनेई ज्यांना प्रमुख पदांवर नियुक्त करू शकत होते अशा लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा इस्रायलचा प्रयत्न होता.
हिजबुल्लाह म्होरक्याच्या खात्म्याची कहाणी
इराणच्या दुसऱ्या स्तरावरील नेतृत्वाला भयभीत करण्यासाठी इस्रायलने हिजबुल्लाहच्या प्रमुख कमांडर्सच्या खात्म्याचाही उल्लेख केला हेता. नसरल्लाहच्या उत्तराधिकाऱ्यासोबत काय घडले याची आठवण इस्रायली गुप्तचर यंत्रणेने वैयक्तिक स्तरावर इराणच्या अधिकाऱ्यांना करून दिली होती.
खामेनेई यांच्यासमोर समस्या
इस्रायलच्या मोहिमेचा परिणाम म्हणून खामेनेई यांना मारले गेलेल्या अधिकाऱ्यांचे उत्तराधिकारी नियुक्त करणे अवघड ठरले. फोन कॉलसोबत काही इराणी अधिकाऱ्यांच्या घराबाहेर पत्रं ठेवून इशारे देण्यात आले होते. तर काही जणांच्या पत्नींशी संपर्क साधत धमकी देण्यात आली होती.