...तर नक्की नोकरी मिळेल
आजच्या काळात नोकरी मिळविणे, आणि तीही मनाजोगती, हे कार्य किती कठीण आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. सध्याच्याच काळात कशाला, पण कोणत्याही काळात हवी तशी नोकरी मिळणे सोपे नव्हते आणि पुढेही असणार नाही. अगदी मुलाखतीसाठी बोलावणे आले तरी, नोकरी नक्की मिळेलच, अशी परिस्थिती नसते. त्यामुळे नोकरी मिळाली तर ते महद्भाग्य, अशी स्थिती आहे. आपल्याला नोकरी मिळणार की नाही, हे समजायचे असे हा प्रश्न असतो.
तथापि, अमेरिकेतील टेक्सास प्रांतात राहणाऱ्या 28 वर्षांच्या कॅथरीन लॉकहार्ट या तरुणीने एक वेगळेच प्रतिपादन केले आहे. नोकरीच्या मुलाखतीत आपल्याला जर अगदी शेवटी एक विशिष्ट प्रश्न विचारला गेला, तर नक्की आपली नोकरीसाठी निवड होणार हे निश्चित असते, असे या युवतीचे म्हणणे आहे. हे आपल्या अनुभवाचे बोल आहेत, असे या युवतीचे ठाम म्हणणे आहे.
हा प्रश्न कोणता असा प्रश्न आपल्या मनात निश्चितच निर्माण होतो. या युवतीच्या म्हणण्यानुसार जर मुलाखतीच्या शेवटी, आपल्याला ‘तुम्हाला काही विचारायचे आहे का ?’ असा प्रश्न विचारला गेला, तर त्या नोकरीसाठी आपली निवड नक्की होणार, असे निश्चित समजा. या प्रश्नाला उत्तर होय असेच द्या, असा तिचा आग्रह आहे. प्रश्न प्रतिदिन कामाच्या स्वरुपासंबंधी विचारा, कामाची आणि तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांची नेमकी माहिती करुन घ्या. तसे केल्यास तुमच्या कामासंबंधीच्या आस्थेविषयी नोकरी देणाऱ्याच्या मनात शंका राहणार नाही. तसेच, सुट्या किती असतात आणि पगारी सुट्यांची संख्या किती, असले प्रश्न अजिबात विचारु नका, असेही तिने इच्छुकांना सुचविले आहे.