For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...तर इराणचे अस्तित्व संपवणार!

06:58 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
   तर इराणचे अस्तित्व संपवणार
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा : दोन्ही देशांमध्ये हल्लासत्र सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था

तेहरान, वॉशिंग्टन

Advertisement

मध्यपूर्वेतील तणाव कायम असतानाच अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. शनिवारी रात्री अमेरिकन नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी रात्री उशिरा होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासच्या 10 इराणी लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इराणच्या एका लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले होते. इराणने एम/टी किकू या तेलवाहू जहाजावर केलेल्या ड्रोन हल्ल्याचे हे प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकन लष्कराचे मानले जात आहे. पुन्हा वाढत असलेल्या तणावामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जर इराणने आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली नाही, तर त्याचे अस्तित्व संपुष्टात येईल’ असा इशारा दिला आहे.

इराणच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासच्या इराणी लष्करी तळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन आणि कुवेत या दोन्ही देशांवर हल्ला केल्यानंतर हे हल्ले झाले आहेत. यामुळे युद्ध टाळण्यासाठी दोन्ही देशांमधील अंतरिम कराराला धोका निर्माण झाला आहे, तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावही वाढला आहे. यामुळे तेल आणि वायूचा पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला असून, तेल आणि वायूच्या किमती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील पुन्हा सुरू झालेल्या लष्करी संघर्षांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारी जहाज वाहतुकीच्या हळूहळू पुनरुज्जीवनाला धोका निर्माण झाला आहे. सुरुवातीच्या अमेरिका-इराण शांतता करारानुसार हा महत्त्वाचा जलमार्ग पुन्हा सुरू करण्याची तरतूद होती. असे असूनही गेल्या तीन दिवसांतील नवीन हल्ल्यांमुळे जहाज चालकांमध्ये चिंता वाढली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक पोस्ट शेअर करत इराणला सज्जड दम भरला आहे. ‘इराणने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेच्या विमानांनी इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक सुविधांवर तसेच किनारी रडार स्थळांवर हल्ला केला आहे. मात्र, भविष्यात असे हल्ले सुरूच राहिल्यास आम्ही सावधगिरीने वागू शकणार नाही अशी वेळ येऊ शकते. आमच्यावर हे काम लष्करी बळाने पूर्ण करण्याची वेळ आल्यास इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अस्तित्वच संपुष्टात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराणचाही अमेरिकेला इशारा

दरम्यान, इराणनेही अमेरिकेला इशारा देताना शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास शांतता करार धोक्यात येऊ शकतो असे म्हटले आहे. दरम्यान, इराणी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कुवेत सतर्क आहे. कुवेती सैन्याने आपली हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे. देशावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होत असल्याचे सैन्याने म्हटले आहे. त्यामुळे आम्ही हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.