For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

..तर प्रसंगी अग्निवीर योजनेत बदल करू

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
  तर प्रसंगी अग्निवीर योजनेत बदल करू
Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य : सैन्याला युवांची गरज : काँग्रेसच्या टीकेची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

आमचे सरकार गरज भासल्यास अग्निवीर भरती योजनेत बदल करण्यास तयार असल्याचे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले आहे. अग्निवीरांचे भविष्य सुरक्षित राहिल हे सरकारने सुनिश्चित केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अग्निवीर योजनेद्वारे सरकार संरक्षण दलांमध्ये वेतन अन् पेन्शनसाठीचा खर्च कमी करत शस्त्रास्त्र खरेदीवर भर देत असल्याचे मानले जात आहे. सैन्याला युवांची गरज आहे. युवा हा उत्साही अन् ऊर्जावान असतो, तसेच तंत्रज्ञान लवकर आत्मसात करू शकतात. अशा स्थितीत आम्ही या युवांचे भविष्य देखील सुरक्षित राहिल याची काळजी घेतली आहे. गरज भासल्यास आम्ही योजनेत बदलही करू, असे राजनाथ सिंह म्हणाले. अग्निवीर योजना लागू होताच विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केले होते. या योजनेत केवळ 4 वर्षांची सेवा म्हणजे देशाच्या युवांची फसवणूक असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. तर काँग्रेसने स्वत:च्या निवडणूक प्रचारात अग्निवीर योजनेला मुख्य मुद्दा केले आहे. केंद्र सरकारने 14 जून 2022 रोजी तिन्ही संरक्षण दलांमध्ये युवांना मोठ्या संख्येत भरती करण्यासाठी अग्निपथ योजना सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत तरुण-तरुणींना केवळ 4 वर्षांसाठी संरक्षण दलात सेवा बजावावी लागणार आहे. अग्निवीरांपैकी 25 टक्के जणांना संरक्षण दलाच्या सेवेत कायम ठेवले जाणार आहे. अग्निवीरांसाठी सरकारने आर्थिक तरतूद केली असून त्यांना निमलष्करी दलाच्या भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

राहुल गांधी यांची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलिकडेच ग्वाल्हेरमध्ये अग्निवीर भरतीशी निगडित युवा, माजी सैनिकांशी चर्चा केली होती. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यास अग्निवीर भरती योजनेत आवश्यक सुधारणा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. अग्निवीर योजनेला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला होता.

Advertisement
Tags :

.