For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर मत्स्यालय निधी परत जाण्याची नामुष्की आली नसती

03:17 PM Apr 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तर मत्स्यालय निधी परत जाण्याची नामुष्की आली नसती
Advertisement

नगरसेवक महेश कांदळगावकर यांचा वैभव नाईकांना टोला

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मत्स्यालय निधी परत का गेला हा प्रश्न खरतर माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वतःला विचारावा असा टोला माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी लगावला आहे .

Advertisement

नगर परिषद मत्स्यालय

माजी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यालय निधी परत जाण्यास जबाबदार कोण हा प्रश्न खरतर स्वतःला विचारणे अपेक्षित होते. म्हणजे त्याच खर उत्तर मिळाले असत. कारण, प्रशासनातील दिरंगाई आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्या अभावी हा निधी परत गेल्याच त्यांनी आपल्या मालवण नगर परिषद भेटीच्या दरम्यान मत व्यक्त केले आणि विद्यमान मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. वास्तविक पाहता प्रशासनातील दिरंगाई ही आमचा कालावधी २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरू झाल्यावर सुरू झाली होती आणि त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नाईक २०२१ ते २०२४ विधानसभा निवडणूक कालावधी पर्यंत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याच कालावधीत प्रशासन दिरंगाई करत होते. त्यावेळी वेळोवेळी तत्कालीन प्रशासक संतोष जिरगे हे मनमानी कारभार करत असल्या बाबत आम्ही त्यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष म्हणून सातत्याने सोशल मीडिया, पेपर यांच्या मधून आमची भूमिका मांडत होतो. त्यावेळी प्रशासकावर अंकुश ठेवला असता तर कदाचित मत्स्यालय निधी परत पाठवण्याची नामुष्की आली नसती. कुठल्याही निधीला एक कालावधी असतो आणि त्या कालावधीत काम झाले नाही तर शासनाला तो परत करावा लागतो हा नियम आहे. मत्स्यालयाच्या जागेकडे जाण्याच्या वाटेबाबतचा भूसंपादनाचा विषय होता तो आमच्या कालावधीत सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. जागा मालकांबरोबर अनेक बैठका पण झाल्या होत्या. पण आमचा कालावधी संपल्यानंतर प्रशासकीय कालावधीत याबाबत कुठलेही प्रयत्न न झाल्यामुळेच हा निधी परत पाठवावा लागला आहे ही वस्तुस्थिती आहे.

भाजी मार्केट/ सफाई कामगार इमारत

मत्स्यालय हा एकच विषय नाही तर भाजी मार्केट इमारतीचे काम जे आमच्या कालावधीत सुरू झाले होते ते सीआरझेड परवानगी मुळे अडले होते. हा विषय प्रशासकीय तीन चार वर्षाच्या कालावधीत सोडवला गेला नाही त्यामुळे ही इमारत अपूर्ण आहे. आमदार निलेश राणेंनी निवडून आल्यानंतर आपल्या पहिल्या आढावा बैठकीत हा विषय घेतल्याने आता याबाबत हा विषय परवानगी स्तरावर आहे. त्याचप्रमाणे मालवण नगरपरिषद सफाई कामगार इमारती साठी आम्ही केलेल्या ठरावामध्ये काही त्रुटी राहिल्याने नव्याने दुरुस्ती करून नवीन ठराव करून देणेबाबत , तसेच काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याबाबत शासनाने कळविल्याने ते देणे आवश्यक होते . पण तत्कालीन मुख्याधिकारी जिरगे यांनी याबाबत ना ठराव केला , ना मुदतीत उत्तर दिले ना संबधित विकासक याला काम बंद करण्याबाबत पत्र दिले. याबाबत पण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो . याबाबतही तत्कालीन आमदार नाईक यांनी योग्य पाठपुरावा केला असता तर आज ही इमारत तयार झाली असती .

बायोटॉयलेट गाड्या/ कचरा मशीन

आमच्या कालावधीत पर्यटक सुविधा म्हणून पाच बायोटॉयलेट गाड्या घेतल्या होत्या. प्रशासकीय काळात त्याचा वापर होत नसल्याबाबत सुचना करूनही त्याबाबत काहीही कार्यवाही न केल्याने या गाड्या नादुरुस्त झाल्या. या नादुरुस्त गाड्यांची दुरुस्ती आमदार निलेशजी राणे यांनी निवडून आल्यावर स्वखर्चाने करून दिल्या आहेत. तसेच कचऱ्यापासून खत निर्मितीच्या मशीन नादुरुस्त असल्याने दुरुस्त करून घेणे बाबत पाठपुरावा करूनही त्या दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. त्या मशीन सुद्धा आमदार निलेशजी राणे यांनी स्वखर्चाने दुरुस्त करून दिल्या होत्या.

नगरपरिषद गाळे लिलाव
मच्छीमार बांधवाना गृहीत धरून मालवण नगर परिषद मच्छी मार्केट येथे बांधलेल्या गाळ्याचे भाडे ठरवून भाड्याने देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कुठलीही कार्यवाही केली गेली नाही . गाळ्यांचे लिलाव , नगर परिषद मुदत संपलेल्या भाड्याच्या इमारती कित्येक वर्ष न झाल्याने नगर परिषदेला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता हे लिलाव का लावले नाही म्हणून सध्याच्या मुख्य अधिकारी यांना प्रश्न विचारता तर त्या वेळच्या प्रशासकाला जाब विचारला असता तर हे नुकसान झाले नसते.

भुयारी गटार योजना

भुयारी गटार योजना आमच्या मुदतीत व्हावी म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न केले. हा ठेकेदार बदलला असता तर नवीन टेंडर प्रक्रिया करणे , यासाठी जादा निधी उपलब्ध करून घेणे, तसेच जुन्या ठेकेदाराला काढून टाकल्यावर त्यांच्या कडून कायदेशीर कारवाईत आपली योजना अडकून राहील याचा विचार करूनच आम्ही त्याच ठेकेदाराकडून काम करून घेण्याबाबत प्रयत्न केले. जर आमची भूमिका चुकीची होती तर तेव्हा अधिकार वाणीने ठेकदार बदलणे बाबत सूचना केली असती तर आम्ही ते पण केले असते. पण याचा दोष तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून आमच्या वर देणे चुकीचे आहे. आमच्या कालावधीत काही प्रमाणात आम्ही भुयारी गटार चे काम करून घेतले आहे पण आमचा कालावधी संपल्या नंतर प्रशासकीय कालवधीत एक टक्का पण काम झाले नाही आणि कोट्यवधीची बिल अदा केली गेली त्यावेळी या दीर्घ प्रशासकीय कालावधीत हा ठेकेदार बदलण्याची कारवाई का झाली नाही याच पण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमचा कालावधी संपल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष म्हणून सातत्याने प्रशासक संतोष जिरगे यांच्या मनमानी कारभाराबाबत दोन अडीज वर्ष भूमिका मांडत होतो पण आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ना आमच्या सूचनांवर प्रशासक यांच्याकडे पाठपुरावा केला गेला . आता ज्याप्रमाणे मुख्याधिकारी यांना जाब विचारला गेला तसा जाब आमच्या वेळी आम्हाला घेऊन तत्कालीन प्रशासक जिरगे यांना का विचारला गेला नाही याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे पूर्वी आवश्यक पाठपुरावा न केल्यामुळे न झालेल्या कामांचे खापर नूतन मुख्याधिकारी आणि दोन तीन महिन्या पूर्वी बसलेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या वर फोडणे योग्य नाही . आम्ही नेहमी जाहीर कबुली दिली आहे की जर चांगल्या कामाचे श्रेय माझे आहे तर चुकीच्या कामाची जबाबदारी पण माझीच आहे
.
विकासकामांना भरघोस निधी

सध्या आमचे पक्षप्रमुख तथा विद्यमान उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नारायणराव राणे , आमदार निलेशजी राणे, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या मार्फत कोट्यवधीचा विकास निधी मालवण नगर परिषदेस प्राप्त होत आहे . याचा आकडा जेव्हा वर्षाच्या शेवटी जाहीर होईल तेव्हा तो मालवण वासियांसाठी नक्कीच सुखावह असेल यात शंका नाही असे माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक मालवण न प. महेश कांदळगांवकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.