... तर पर्यटन व्यावसायिकांवर येणार उपासमारीची वेळ
आमदार मायकल लोबो यांचा संबंधितांना इशारा : आमदार, मंत्री, पंचायत मंडळाला पाडले उघडे
म्हापसा : राज्यात विदेशी पर्यटक येण्याची संख्या घटत असल्याचे आपण चार वर्षांपूर्वी बोललो होतो आणि आज ती सत्य परिस्थिती झाली आहे. जे दरवर्षी गोव्यात येतात ते येत आहेत, मात्र युवा पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे. रशिया ा युक्रेन युद्धामुळे या दोन्ही देशातील पर्यटकांचे येणे बंद आहे. इतर देशातील वृद्ध पर्यटक येथे येत असून त्यांचीही संख्या हातावर मोजण्याएवढीच आहे. त्यामुळे पर्यटन खाते, शॅकधारक, पंचायत मंडळांनी एकत्रित बसून तोडगा काढला पाहिजे, अन्यथा पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर भाजप कळंगुट मंडळ अध्यक्ष समीर चोडणकर, सुदेश शिरोडकर उपस्थित होते.
परिस्थिती योग्य नाही
समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा रितसर उचलला जात नाही. याबाबत पर्यटनमंत्र्यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी कंत्राटदार बदलण्याचे आश्वासन दिले होते. गोवा माईल्स, टुरिस्ट टॅक्सी, काळ्dया-पिवळ्dया टॅक्सी यांच्यातील वाद अद्याप मिटवण्यात यश आलेले नाही. ही परिस्थिती पर्यटनासाठी योग्य नाही. यात बदल न केल्यास आता येणारे पर्यटकही बंद होऊन पर्यटनक्षेत्र अधोगतीकडे जाईल, अशी भीती लोबो यांनी व्यक्त केली.
इडली-सांबार विकून कोणती संस्कृती दाखविता?
किनारपट्टीवरील शॅकधारकांनी आपले शॅक दिल्ली, केरळवाल्यांना भाडेपट्टीवर दिले असून ते येथे इडली-सांबार, वडापाव विकतात. हीच संस्कृती आम्ही पर्यटकांना दाखविणार का? सरकारने किनारपट्टीवरील शॅक केवळ गोमंतकीयांनाच चालवण्यास द्यावे. जे कुणी बाहेरील लोकांना शॅक भाडेपट्टीवर देत असतील ते त्यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्या गोमंतकीयाला चालवण्यास द्यावे, अशी मागणी लोबो यांनी केली.
समुद्र किनाऱ्यांवर कुत्र्यांचा हैदोस
राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर कुत्री आढळतात इतकेच नव्हेतर ते विदेशी पर्यटकांचा चावाही घेतात. याबाबत पशुसंवर्धन खात्याला, मंत्र्यांना विचारल्यास ते स्थानिक पंचायतीकडे बोट दाखवितात. स्थानिक पंचायत दुसऱ्यांकडे बोट दाखविते. मग यावर उपाय काढणार तरी कोण? जगात कुठेही फिरायला गेल्यास समुद्रकिनाऱ्यांवर कुत्री अजिबात आढळत नाहीत. सरकारने याकडे लक्ष देऊन समस्या सोडविणे गरजेचे आहे.
कॅब सिस्टमवर बंदी घालावी
सध्या किनारी भागात कारगाड्या खूप झाल्या असून कॅब सिस्टम आता बंद करायला हवी, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली. पर्यटनमंत्री आम्हाला पाठिंबा देतात मग आम्हीही त्यांना सहकार्य करायला हवे. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न, किनारी भागातील स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, शौचालये, टॅक्सी व्यावसायिकांमधील संघर्ष यावर तोडगा लवकरात लवकर काढावा, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली.
अन्यथा वीज खांबांवरील केबल कापून टाकणार
वीज खांबांवर लोंबकळणाऱ्या इंटरनेट केबल्स काढून टाका. त्यांच्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ते केबल खाली आले असून पर्यटकांच्या गळ्dयाला लागतात. सकाळी, रात्री चालत जाणाऱ्या पर्यटकांना हे केबल्स लागतात. याची जबाबदारी कुणी घ्यावी. जुने, नादुरुस्त केबल्सही ऑपरेटर्स काढून नेत नाहीत. तेथेच गुंडाळून ठेवतात. याचा सर्वांना त्रास होत आहे. आपण वीज खाते, पंचायतीला पत्र पाठवून कारवाईची मागणी करणार आहे. त्यांनी न काढल्यास आम्ही कापून टाकू यासाठी उच्च न्यायालयातही जाण्यास तयार असल्याचे मायकल लोबो म्हणाले.