...तर भाजपही सत्तेवर राहणार नाही
प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांचा इशारा : फोंड्यात मराठी राजभाषा निर्धार समितीची सभा
फोंडा : गोव्यातील मराठीप्रेमी हीच भाजपाची मतपेढी असून आजवर हे सरकार मराठीजनांच्या पाठिंब्याने सत्तेवर आले आहे. त्यासाठी मराठी राजभाषेचा हा निर्णायक लढा राजकीय माध्यमातूच लढावा लागेल. येणारी विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्येही होऊ शकते. त्यापूर्वी भाजपा सरकारने मराठीला राजभाषेचे स्थान बहाल न केल्यास सर्व मराठीप्रेमींनी मित्रभाव बाजूला ठेऊन शत्रुभाव जागृत ठेवत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी फोंडा येथील जाहीर सभेतून केले आहे. फोंडा प्रखंडतर्फे शुक्रवारी सायंकाळी फोंडा येथील क्रांती मैदानावर मराठी राजभाषेच्या मागणीसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेपूर्वी फोंडा शहरातून निर्धार फेरी काढून या विषयावर जागृती करण्यात आली. सभेला लक्षणीय उपस्थिती होती.
पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी
मुळात भाजपा सरकारनेच प्राथमिक स्तरावर इंग्रजीला अनुदान देऊन मातृभाषेचे खच्चीकरण केले. सरकारच्या मराठी शाळा बंद पडण्यामागे हेच मुख्य कारण आहे. मराठी ही गोव्याचीच भाषा असून ती राजभाषा न झाल्यास त्याचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या गोमंतकीय हिंदू समाजाला दूरगामी परिणाम भोगावे लागतील. मराठीचा हा लढा पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी आहे.
मराठीप्रेमींवर होतोय अन्याय
सरकारी नोकरीमध्ये मराठीची सक्ती शिथील कऊन सरकार खूप मोठा अन्याय करीत आहे. कोकणी ही बोली भाषा असून मराठी ही प्रमाण भाषा आहे. गोव्याची संस्कृती याच भाषेवर उभी असून शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या अभिजात भाषेला राजभाषेचा हक्क कुणालाही नाकारता येणार नाही. हा केवळ मराठी भाषेचा लढा नसून येथील संस्कृती आणि अस्मितेचा लढा आहे. त्यासाठी समस्त गोमंतकीय मराठीप्रेमींकडून सरकारवर दबावा वाढविण्याचे आवाहन सुभाष वेलिंगकर यांनी केली. यावेळी व्यासपीठावर निर्धार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, फोंडा प्रखंड प्रमुख शाणुदास सावंत, चंद्रकांत गावस, डॉ. अनिता तिळवे, रोशन सामंत, अनुजा जोशी, डॉ. दत्ताराम देसाई, मोहन वेरेकर, देविदास सराफ, जयंत मिरींगकर, जयवंत आडपईकर, विनोद पोकळे, विठ्ठलदास नागवेकर, गोविंद देव आदी उपस्थित होते.
भाजप मराठीला विसरला
गो. रा. ढवळीकर म्हणाले, मराठीप्रेमींच्या मतांवरच भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मात्र आज हे सरकार मराठीला विसरले आहे. मराठीजनांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला पुढे जात येणार नाही. मराठी भाषेला तिचा न्याय्य हक्क मिळाला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीपूर्वी राजभाषेचा विषय तडीस लावण्यासाठी मराठीप्रेमींनी निर्धार कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठीच गोव्याची संस्कृती-अस्मिता
चंद्रकांत गावस म्हणाले, मराठी हीच गोव्याची लोकसंस्कृती आणि अस्मिता आहे. येथील मातीत आणि जनमानसात ही भाषा ऊजली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या भाषेचे स्थान कुणीही नाकाऊ शकत नाही. मराठीला राजभाषाचे स्थान देण्यातच पुढील पिढ्यांचे भवितव्य आहे. ॲड. रोशन सामंत व अन्य वक्त्यांची यावेळी भाषणे झाली. शाणुदास सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक तर उमेश दाणी यानी सूत्रसंचालन केले. सभेला मोठ्यासंख्येने मराठीप्रेमी उपस्थित होते.
... तर गोव्याच्या संस्कृतीचा ऱ्हास
डॉ. दत्ताराम देसाई म्हणाले, गोव्यातून मराठी नामशेष झाल्यास येथील संस्कृतीही टिकणार नाही. त्यामुळे तिला राजभाषेचे मानाचे स्थान देण्यातच येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य आहे.