...तर भारताच्या वस्तूंवरही कर लावणार!
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेतून आयात पेलेल्या वस्तूंवर भारताने कर लावल्यास भारताच्या वस्तूंवरही आम्ही कर लावू, असा इशारा अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. भारत आणि ब्राझील हे देश अमेरितून आयात केल्या गेलेल्या काही विशिष्ट वस्तूंवर मोठा कर लावतात, अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली.
चीनच्या वस्तूंसंबंधी तुमचे धोरण काय असेल, असा प्रश्न त्यांना एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. चीनशी अमेरिका व्यापारी करार करणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. त्यासंदर्भात उत्तर देताना त्यांनी भारताचा आणि अन्य काही देशांचाही उल्लेख केला. आमचे धोरण जशास तसे असे असेल. चीन आणि कॅनडा तसेच ब्राझील आदी देशांतून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर 25 टक्के अतिरिक्त कर लावला जाईल, अशी घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. काही देश आमच्या कडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100 टक्के कर लावतात. मग आम्ही त्यांच्या वस्तूंवर काहीच कर लावायचा नाही का, अशी पृच्छा त्यांनी केली. त्यांना आमच्या मालावर कर लावायचा असेल तर ते लावू शकतात. आमचा आक्षेप नाही. तथापि, आम्ही त्यांच्या वस्तूंवर तसाच कर लावला तर तेही अनाठायी मानले जाऊ नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
20 जानेवारीला घेणार सूत्रे
अमेरिकेतील नियमानुसार 20 जानेवारीला नव्या अध्यक्षांचा शपथविधी केला जातो. त्यामुळे 20 जानेवारी 2025 या दिवशी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी आरुढ होत आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार या नात्याने त्यांनी डेमॉव्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा मोठ्या अंतराने पराभव केला आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते कोणती धोरणे अवलंबिणार, यासंबंधी साऱ्या जगात उत्सुकता आहे.