नेमेचि येतो मग पावसाळा...
ऑटोरिक्षांना मीटरप्रमाणे भाडे हे आतापर्यंत केवळ दिवास्वप्नच
बेळगाव
नेमेचि येतो मग पावसाळा...
याप्रमाणे बेळगावच्या ऑटोरिक्षांना मीटरसक्ती लावण्याबाबत म्हणता येईल. दरवर्षी रिक्षांना मीटर बसविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होते. रस्ते सुरक्षितता समितीच्या बैठकीत बरीच चर्चा झडते. त्यानंतर ‘आता रिक्षांना मीटरसक्ती’ असे जाहीर करण्यात येते आणि पुन्हा जैसे थे परिस्थितीच राहते. मीटर काही लागत नाही, रिक्षाचालक ऐकत नाही आणि भरमसाट पैसे देण्याचे शुक्लकाष्ट काही सुटत नाही.
बेळगावमधील रिक्षाचालक आणि नागरिक यांच्यात नेहमीच समन्वयाचा अभाव राहिला आहे. मीटरप्रमाणे भाडे हे केवळ दिवास्वप्न ठरले आहे. रिक्षाचालक तसेही भाडे अधिक लावतात, ही जनतेची तक्रार आहेच. त्यातच सरकारच्या शक्ती या गॅरंटी योजनेमुळे रिक्षाचालकांची कोंडी झाली आहे. फुकट बस प्रवासाचा लाभ महिलांनी प्रचंड प्रमाणात घेतला. बस प्रवास फुकट असल्याने महिला गटागटाने प्रवास करू लागल्या. बसथांब्यांवर तासन्तास थांबून बसची वाट बघून बस आल्यावरच जाणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. परिणामी एकूणच रिक्षाचालक आणि वडापचालकांची गैरसोय झाली आहे.
रिक्षाचालक दामदुप्पट भाडे सांगतात, ही बेळगावकरांची नेहमीची तक्रार आहे. सकाळी आणि रात्रीच्या सत्रात कोठेही जायचे असले तरी दीडशे ते दोनशे रुपये रिक्षाचालक आकारतात. मीटरनुसार भाडे हे रिक्षाचालकांनी कधीच मान्य केले नाही. विविध योजनांचा आम्हाला फटका बसला आहे, पेट्रोलचे दर वाढले आहेत, रिक्षाचालकांची संख्या वाढल्याने स्पर्धाही वाढली आहे. त्यामुळे भाडे मिळविण्यावर मर्यादा येत आहेत. शिवाय बेळगावच्या रस्त्यांची सतत दुरवस्था असल्याने रिक्षा चालविणेही एक कसरत झाली आहे, अशा त्यांच्या तक्रारी आहेत.
वर्दीच्या रिक्षांचा प्रश्नही गंभीरच
वर्दीच्या रिक्षांचा प्रश्नही गंभीरच आहे. केवळ सहाच मुलांना घेणे, हा नियम असला तरी हा नियम आमचे आर्थिक नुकसान करणारा आहे, असे रिक्षाचालकांना वाटते. त्यामुळे ते अधिक विद्यार्थी रिक्षामध्ये घेतात. पालकही आर्थिक विचार करून रिक्षामध्ये जास्त मुले असली तरी त्याकडे कानाडोळा करतात. एका अर्थाने हे एक दुष्टचक्रच निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये सामान्य माणूस भरडत चालला आहे. रिक्षांना मीटरसक्ती ही घोषणा काही नवी नाही. जर खरोखरच पुढील महिन्यापासून रिक्षांना मीटरसक्ती करण्यात आली तरच त्यात काही तरी नावीन्य म्हणावे लागेल. अन्यथा अनेक घोषणांप्रमाणे ही घोषणा हवेत विरुन जाईल आणि जैसे थे याप्रकारे सर्व काही सुरू राहील.
रिक्षाचालकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे
बेळगावकर विविध स्वरुपात कर भरतात. परंतु त्यांच्या नशिबी स्वच्छ खड्डेमुक्त रस्ते कधीच नाहीत. प्रशासन आणि रिक्षाचालक यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका नागरिकांनाच बसतो. त्यामुळे त्यांच्या खिशालाही कात्री लागते. सरसकट सर्वांनाच एकाच मापाने तोलता ाsणार नाही. नियमाला अपवाद असतातच, हे लक्षात घेतले तरीसुद्धा बसथांब्यांवरच रिक्षा उभी करणे, बसच्या पुढे वाटेल तशी रिक्षा चालविणे, दामदुप्पट भाडे सांगणे, या वृत्तीमुळे प्रवाशांनी बसला पहिली पसंती दिली आहे. त्याबाबत रिक्षाचालकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.