For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

06:28 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
Advertisement

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांचा इशारा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्ह्यात उसाच्या हंगामात अपघातांची संख्याही वाढती आहे. ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंतच्या पाच महिन्यात ऊसवाहू ट्रॅक्टरमुळे अपघातातील बळींची संख्याही वाढती आहे. अपघात टाळण्यासाठी पोलीस दलाने कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यापुढे मद्यपी वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातात एखाद्याचा बळी पडल्यास त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी दिली.

Advertisement

पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, दरवर्षी जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात सुमारे 800 जणांचा बळी पडतो. उसाच्या हंगामात अपघात वाढतात. एरवी दरमहा सुमारे 50 जण अपघातात बळी पडतात. ऑक्टोबरपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत या पाच महिन्यांच्या कालावधीत दरमहा 70 ते 80 जणांचा अपघातात मृत्यू होतो. रोज एक ते दोन बळी जातात.

ट्रॅक्टरच्या मागे रिफ्लेक्टरची गरज

अपघात टाळण्यासाठी ऊसवाहू ट्रॅक्टरचालकांनी ट्रॅक्टरच्या मागे रिफ्लेक्टर लावणे सक्तीचे आहे. कारखानदारांनीही रिफ्लेक्टर लावले आहे की नाही, याची पाहणी करायची आहे. सुसाट ट्रॅक्टर चालवल्यामुळे अनेक वेळा अपघात संभवतो. नशेत वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करणार आहे.

खुनाच्या गुन्ह्याइतकाच गंभीर

यापूर्वी केवळ ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’संबंधी गुन्हा दाखल केला जात होता. आता नशेत वाहने चालविणाऱ्या चालकांमुळे एखाद्याचा बळी गेल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात येणार आहे. खुनाच्या गुन्ह्याइतकाच हा प्रकारही गंभीर असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.