For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर अतोनात नुकसान!

06:47 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
तर अतोनात नुकसान
Advertisement

अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यानचे युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या युद्धनीतीमुळे हैराण झालेले आहेत, हतबल झालेले आहेत. अगोदर दोनवेळा इराणला त्यांची होर्मुझ सामुद्रधुनी त्वरित खुली करा, नाहीतर विध्वंसक कृती होईल आणि त्याला सामोरे जा, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. अगोदर दिनांक 21 मार्च रोजी हा इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा संघर्ष अधिक तीव्र झाला. त्यामुळे 28 मार्च रोजी आणखी पाच दिवसांची मुदत दिली, मात्र इराण कोणत्याही बाबतीत तडजोड करायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धविराम करू पाहत आहे, तह करू पाहत आहे, असे आपणच एकतर्फी जाहीर केले. इराण कोणत्याही स्थितीत अमेरिकेला बधले नाही. या युद्धामुळे इराणचे जे प्रचंड नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई आम्हाला त्वरित द्यावी. तोपर्यंत आम्ही सामुद्रधुनी खुली करू शकणार नाही. एवढेच नव्हे, तर यानंतर या होर्मुझवरून जी काही जहाजे जातील त्यांना कर द्यावा लागेल, असेही इराणने बजावले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली अतिरिक्त मुदत आज दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता संपुष्टात येत आहे. ट्रम्प यांनी इराणवर शेलक्या भाषेतून टीका केलेली आहे, मात्र इराण होर्मुझ सामुद्रधुनीचा चिंचोळा मार्ग खुला करू इच्छित नाही. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होत नाही. कोणताही देश माघार घेण्यास तयार नसल्याने गंभीर परिणाम जागतिक पातळीवर होत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी म्हणजे पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा चिंचोळा परंतु तेवढाच अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग आहे. तो बंद ठेवल्याने अनेक राष्ट्रांमध्ये गंभीर परिणाम निर्माण झाले आहेत, कारण इराणकडे ही सामुद्रधुनी हेच खरे तर धारदार शस्त्र आहे. या ठिकाणाहून नैसर्गिक वायू त्याचबरोबर खनिज, तेलाचा प्रचंड प्रमाणात पुरवठा इतर देशांमध्ये केला जातो. सध्या जे तणावपूर्ण वातावरण आहे त्यातून अनेक देशांची मोठ्या प्रमाणात जहाजे या सामुद्रधुनीच्या आसपास अडकून पडली आहेत. त्यातून अनेक देशांवर इंधनांचे संकट निर्माण झाले आहे. भारतासह चीन, रशिया, मलेशिया इत्यादी राष्ट्रांची जहाजे या सामुद्रधुनीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे युद्ध आज सहा आठवडे झाले तरीदेखील चालू आहे. इराण घाबरून जाईल आणि त्यामुळे युद्धाची तीव्रता कमी होईल किंवा ते शरणागती पत्करेल असे अमेरिकेला वाटले होते. परंतु इराण संपूर्ण ताकदीनिशी या युद्धात उतरले. अमेरिकेला जास्तीत जास्त त्रास होण्यासाठी ज्या ज्या आखाती राष्ट्रांमध्ये अमेरिकेने आपले तळ निर्माण केले होते, त्या त्या राष्ट्रांवर देखील इराणने जोरदार हल्ले चढविले. त्यामध्ये त्या राष्ट्रांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेने त्या राष्ट्रांचा दुऊपयोग तर केलाच शिवाय त्यांच्याकडून युद्धाचा खर्चदेखील मागून घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता आखाती राष्ट्रे एक होतील आणि अमेरिकेलाच धडा शिकवतील की काय, हे पहावे लागेल. सहा आठवडे चाललेल्या या युद्धामुळे आपली ताकद काय आहे, हे इराणने अमेरिकेला दाखवून दिले. अमेरिकेपुढे शरणागती पत्करत तर नाही, उलटपक्षी अमेरिकेला इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या माध्यम प्रमुखाद्वारे बरेच सुनावले आणि इराणमधील नागरिकांवर जादा हल्ले चढविल्यास त्याचे विध्वंसक परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा अमेरिकेला दिला. हा इशारा अमेरिकेला सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आज सायंकाळी मुदत संपल्यानंतर पुढे काय होईल, याची उत्सुकता म्हणता येणार नाही परंतु चिंता मात्र निश्चितच निर्माण झालेली आहे. अनेक राष्ट्रांमध्ये इंधन संकट तसेच वायु संकट निर्माण झालेले आहे आणि जोपर्यंत हे युद्ध संपुष्टात येत नाही किंवा दोन्ही राष्ट्रांमध्ये तडजोड होत नाही तोपर्यंत अनेक संकटांना सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नाही. ट्रम्प यांच्या या युद्धनीतीला खुद्द त्यांच्या राष्ट्रामध्येच विरोध होत आहे. युद्ध निर्माण करण्याची परिस्थिती खरोखरच होती का? असा सवाल आता अमेरिकेतील मंडळी ट्रम्प यांना करीत आहेत. युद्ध जागतिक विध्वंसाकडे जात आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.