...तर राजीनामा काही मिनिटांत स्वीकारेन!
नाराज आमदारांना मुख्यमंत्री शिवकुमार यांचा इशारा
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून 19 आमदार मंत्रिपदी शपथबद्ध झाले. मात्र, काँग्रेसमधील डझनपेक्षा जास्त आमदार मंत्रिपदे न मिळाल्याने नाराज आहेत. काहींनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे, तर काहींनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. दरम्यान, काँग्रेसश्रेष्ठींच्या सूचनेवरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांनी राजीनामा दिल्यास त्यांचे राजीनामे काही मिनिटांतच स्वीकारले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपदे हुकलेले आमदार सामूहिक राजीनाम्यासाठी सरसावल्याबद्दल बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, ही राजकारणातील सामान्य बाब आहे. जे राजीनामा देतात त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. जर राजीनामा दिला, तर अशा आमदारांचे राजीनामे काही क्षणांतच स्वीकारेन. जर पक्ष हवा असेल तर आणि भविष्य हवे असेल, तर आमदारांनी पक्षातच राहावे, असे ते मार्मिकपणे म्हणाले.
काल (सोमवारी) रात्री मला जे काही सांगायचे होते ते सांगितले आहे. धरमसिंग आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना मला मंत्रिपद नाकारण्यात आले होते. तेव्हा मी राजीनामा देऊ शकलो नसतो का? तेव्हा मी आणि परमेश्वर संयम बाळगला नव्हता का? वीरेंद्र पाटील मुख्यमंत्री असताना एस. बंगारप्पा, धरमसिंग यांना मंत्रिपद दिले गेले नाही. संयम राखल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले नाहीत का, असे प्रश्न शिवकुमार यांनी उपस्थित केले. सर्व परिस्थितीत संयम बाळगावा लागतो. पक्ष खूप महत्त्वाचा आहे. जर कोणी राजीनामा दिला, तर मी 5 मिनिटांत तो स्वीकारेन, असा पुनरुच्चार त्यांनी केलो.
नूतन मंत्र्यांची यादी जाहीर होताच सोमवारी सकाळपासून मंत्रिपदाची संधी हुकलेल्या अनेक इच्छुक आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. या सर्व घडामोडींची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री शिवकुमार यांना कोणाच्याही विरोधाला किंवा धमकीला बळी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुणीही राजीनामा दिला तर तो स्वीकारा, असे निर्देश दिले होते. हायकमांडने निर्देश दिल्यानंतर, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राजीनामा त्वरित स्वीकारण्यात येईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील असंतोष दूर होईल का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
भविष्यात संधी मिळू शकते
सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने सर्व बाबींचा विचार करून नवीन मंत्र्यांची यादी तयार केली आहे. प्रत्येकाला मंत्रिपदे देणे शक्य नाही. त्यामुळे, काही लोकांकडे ज्येष्ठता आणि पात्रता असूनही त्यांना मंत्रिपदे देता आलेली नाहीत. भविष्यात संधी मिळू शकते, ही बाब आमदारांनी समजून घेतली पाहिजे. मंत्रिपद मिळाले नाही, या कारणावरून नाराज आमदारांनी आंदोलन केले तर आणि पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल अशी वक्तव्ये केली, तर ते पक्षविरोधी कृत्य मानले जाईल, असा इशारा काँग्रेस हायकमांडने दिला आहे.
राजीनामे स्वीकारण्याबाबत हायकमांडकडून संदेश
राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झालेल्या अनेक आमदारांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना फोन करून कोणत्याही धमक्या किंवा ब्लॅकमेलला बळी न पडण्यास सांगितले आहे. मंत्रिपदे न मिळाल्याने नाराज होऊन आमदारांनी राजीनामा दिल्यास तो स्वीकारा, असे निर्देश वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे डी. के. शिवकुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे.