‘तर विरोधी पक्ष आघाडी विसर्जित करा’
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/श्रीनगर
विरोधी पक्षांची आघाडी जर केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच करण्यात आली होती, तर आता ती विसर्जित करण्यात यावी, अशी स्पष्ट टिप्पणी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. त्यामुळे या आघाडीच्या स्थैर्यावरचे प्रश्नचिन्ह अधिकच गडद झाले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे विरोधी आघाडीतीलच दोन पक्ष या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर ओमर अब्दुल्ला यांचे हे विधान अतिशय महत्वाचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांचीच या निवडणुकीत छुपी युती झाली आहे, असा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काँग्रेसनेही त्याला तीव्र प्रत्युत्तर दिल्याने वाद चिघळताना दिसत आहे.
अब्दुल्ला संतप्त
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेल्या विरोधी पक्ष आघाडीतील वादामुळे ओमर अब्दुल्ला संतप्त झाले आहेत. अशीच स्थिती राहिली, तर आघाडीचे भवितव्य धोक्यात येईल. आघाडीच्याच काही नेत्यांनी ही आघाडी केवळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित होती, अशी विधाने केल्याने आघाडीच्या भवितव्यासंबंधी अस्पष्टता निर्माण झाल्याचे प्रतिपादन अब्दुल्ला यांनी गुरुवारी केले. अशा स्थितीत आघाडी पुढे प्रगती कशी करणार आणि तिची विश्वासार्हता कशी टिकून राहणार, असे महत्वाचे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
बैठक आयोजित करा
दिल्लीची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक आयोजित करावी. या बैठकीत आघाडीच्या भवितव्याविषयी चर्चा करुन एक स्पष्ट निर्णय घेण्यात यावा. आघाडी टिकावायची असेल तर तिचा कार्यक्रम कोणता असेल, हे उघड व्हावयास हवे. तसेच ती केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल तर ती स्थिती तरी स्पष्ट व्हावी आणि आघाडी विसर्जित झाल्याची उघड घोषणा करण्यात यावी, असे प्रतिपादन ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.
तेजस्वी यादव यांचे विधान
बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे आघाडीविषयी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. विरोधी पक्षांची आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती. आता तिचे महत्व संपले आहे, असे त्यांचे विधान होते. त्यामुळे आघाडीची दिशा नेमकी कोणती, ही स्पष्पटता पुन्हा समोर आली होती.
काँग्रेस एकाकी ?
विरोधी पक्षांच्या आघाडीतील दोन महत्वाचे पक्ष तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत आघाडीतील एकाही पक्षाने काँग्रेसला समर्थन दिलेले नाही. परिणामी आघाडीत काँग्रेस एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढा, अशी मागणी आम आदमी पक्षानेच काही दिवसांपूर्वी केल्याने आगीत तेल ओतले गेले आहे.
काँग्रेस-आप वाद शिगेला
दिल्लीतील विधानसभा संघर्ष केवळ भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यातील आहे. काँग्रेस दिल्लीत नावालासुद्धा नाही, असे विधान करत आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांनी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले आहे. काँग्रेसनेही याला शाब्दिक प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही पक्षांमधील वाद चिघळला आहे.