भारताशी शत्रुत्व हेच त्यांचे एकमेव ध्येय
पाकिस्तानवर पंतप्रधान मोदी यांचा घणाघात : स्वदेशनिर्मित शस्त्रास्त्रांचे सामर्ध्य ‘सिंदूर’ अभियानात निर्विवादपणे झाले सिद्ध
वृत्तसंस्था / दाहोद (गुजरात)
भारताच्या फाळणीमुळे जो देश निर्माण झाला आहे, त्याचे एकमेव ध्येय भारताशी शत्रुत्व करणे हेच आहे. मात्र, त्या देशाने भारताची प्रतिष्ठा आणि सुरक्षा यांच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला जोरदार दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या माताभगिनींचा अवमान करणाऱ्यांची आम्ही गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
गुजरात राज्यातील दाहोद येथे मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते एका जाहीर सभेत सोमवारी भाषण करीत होते. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला शिकविलेला धडा, या घटनांच्या नंतरची त्यांची ही प्रथम गुजरात भेट होती. भारताने ‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रचंड तडाखा दिला आहे. या अभियानाची कारणे आणि त्याचे परिणाम यांच्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ओजस्वी भाषणात प्रकाश टाकला.

भारताला त्रास देण्याचेच काम
पाकिस्तानने आजवर केवळ भारताला त्रास देण्याचेच काम केले आहे. पहलगाम येथे या देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा भारताच्या अस्मितेवरच केलेला आघात होता. धर्म विचारुन निरपराध पर्यटकांच्या क्रूर हत्या करण्यात आल्या. त्याचवेळी आम्ही दहशतवादी संघटना आणि त्यांचे पोषणकर्ते यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार केला होता. ‘सिंदूर’ अभियान त्याचसाठी हाती घेण्यात आले आहे. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ या अभियानात उद्ध्वस्त करण्यात आले असून शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लष्कराने भारताच्या नागरी वस्त्या आणि सेनाकेंद्रांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचे 11 वायुदळ आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली. त्या देशाला हा मोठा धडा आमच्या पराक्रमी सेनादलांनी दिला आहे. भारताच्या सैनिकांनी पुन्हा एकदा आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. आतातरी त्या देशाने शहाणे व्हावे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
स्वयंपूर्णता महत्त्वाची
तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा माझा ध्यास आहे. गेल्या 11 वर्षांच्या आमच्या सत्ताकाळात आम्ही या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. भारताच्या बुद्धीवान आणि कुशल तंत्रविशारदांनी भारताच्या संरक्षण दलांसाठी अनेक स्वदेशनिर्मिती शस्त्रास्त्रे गेल्या 10 वर्षांमध्ये विकसीत केली आहेत. त्याचे प्रत्यंतर ‘सिंदूर’ अभियानात आले आहे. भारताच्या अनेक स्वदेशनिर्मित शस्त्रास्त्रांनी या अभियानात पाकिस्तानला इतर देशांनी पुरविलेल्या शस्त्रांस्त्रांचा चुराडा करून भारताचे तंत्रवैज्ञानिक सामर्थ्यही सिद्ध केले, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काढले आहेत.
सोफिया कुरेशींच्या नातेवाईकांकडून पुष्पवर्षाव
सिंदूर अभियानासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देणाऱ्या भारताच्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे माहेर गुजरातमध्ये आहे. त्यांचे बंधू आणि इतर नातेवाईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मध्ये समाविष्ट झाले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुष्पवर्षाव केला. ते महिलांना प्रगतीच्या मार्गावर पुढे नेत आहेत. त्यांनी आमचा सन्मान वाढविला आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली आहे.
24 हजार कोटींच्या प्रकल्पांची उद्घाटने
आपल्या या गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 हजार कोटी रुपयांच्या अनेक औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. रेल्वेच्या इंजिनांची निर्मिती करणाऱ्या एका कारखान्याचे त्यांनी दाहोद येथे उद्घाटन केले. तसेच अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
रक्त उसळले तापून...
ड पहलगामा हल्ला दृष्ये पाहताना माझे रक्त तापून उसळले : पंतप्रधान मोदी
ड पाकिस्तानने पुन्हा कळ काढल्यास याहीपेक्षा मोठा धडा निश्चितच मिळणार