जातीवरुन पेटवापेटवी, हाच त्यांचा उद्योग
विरोधी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात, संत रविदास जयंती कार्यक्रमात भाषण
वृत्तसंस्था / वाराणसी
जातींच्या नावावर जनतेत फूट पाडणे आणि लोकांना एकमेकांशी झगडत ठेवणे हा एकच उद्योग आता विरोधी आघाडी करीत आहे. दलित आणि आदीवासी समाजातील लोकांना मिळालेली उच्च पदे विरोधी पक्ष सहन करु शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतीपदावर पोहचलेल्या एका आदीवासी महिलेचाही ते दु:स्वास करतात. म्हणूनच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात उमेदवार उभा करुन त्यांनी मुर्मू यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांच्या हस्ते शुक्रवारी संत रविदास यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे ते शुक्रवारी संद रविदास यांच्या 647 व्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात भाषण करीत होते. विरोधी आघाडीतील पक्ष दलीत, मागासवर्गीय आणि आदीवासींचा कैवार घेण्याचे नाटक करीत असले तरी त्यांना या समाजघटकांसंबंधी कोणतेही प्रेम नाही. केंद्र सरकारने या समाजघटकांसाठी ज्या लाभदायक योजना लागू केल्या आहेत, त्यांना विरोधी पक्ष याच कारणांसाठी विरोध करीत आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना जनतेसंबंधी कोणतीही सहानुभूती नाही. ते केवळ आपापली घराणेशाही सांभाळण्यात मग्न आहेत. त्यांच्या घराणेशाहीला धक्का पोहचल्यामुळेच ते स्वत:चा बचाव करण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे करण्याचा त्यांचा हेतू केवळ व्यक्तीगत लाभाचाच असून त्यांना जनतेशी देणेघेणे नाही. असे प्रतिपादनही त्यांनी केले.
गरीबांसाठीच्या योजनांची थट्टा
गरीबांना थेट अनुदानांचा लाभ मिळावा, म्हणून केंद्र सरकारने जनधन बँक खाती योजना लागू केली. विरोधकांनी या योजनेची चेष्टा केली. ग्रामीण भागांमधील गरीब महिलांना उघड्यावर देहधर्म करावे लागू नयेत म्हणून शौचालय निर्मिती योजनेचा प्रारंभ करण्यात आला, तेव्हा विरोधकांनी या योजनेची खिल्ली उडविली. मात्र, आज याच योजना गरीबांसाठी सर्वात लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी खोचक टिप्पणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली.
घराण्यांच्या हातीच सत्ता
आपापल्या पक्षांची सत्ता आपल्या घराण्यांच्या हातीच रहावी यासाठी विरोधी पक्षांचे नेते आपली सर्व शक्ती पणाला लावतात. आपल्या घराण्यांचा लाभ व्हावा म्हणूनच त्यांना सत्ता हवी असते. सत्तेचा उपयोग त्यांनी आजवर कधीही जनतेच्या हितासाठी केलेला नाही. हे घराणेशाही जपणारे नेते दलित, आदीवासी आणि मागासवर्गीयांना निवडणुकीच्या वेळी आपली मतपेढी मानतात. निवडणूक झाली की त्यांना या समाजघटकांची आठवण ठेवावी, असेसुद्धा वाटत नाही. त्यांचे राजकारण केवळ घराणेशाहीमुळे निर्माण झालेल्या स्वार्थाभोवती फिरणारे आहे. देशाचा खराखुरा विकास व्हावा, असे त्यांना मनातून वाटतच नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
संत रविदासांवर अढळ श्रद्धा
आपण संत रविदास यांनी दर्शविलेल्या मार्गानेच चालत आहोत. रविदास यांच्या लक्षावधी भक्तांची सेवा करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. संत रविदास जणू मला बोलावतात, म्हणूनच मला अनेकदा त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी लाभली आहे. संत रविदास यांचा जन्म वाराणसीतच झाला. त्यांनी सध्याचा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा येथे आपल्या दिव्य कार्याचा विस्तार केला. पददलीत आणि शोषित वर्गाला आपल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी सन्मान आणि स्वाभिमान मिळवून दिला. हे त्यांचे कार्य ईश्वरी आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केली. या कार्यक्रमाला लक्षावधी लोकांची उपस्थिती होती.
पुतळ्याचे अनावरण
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत रविदास यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘संत रविदान स्थली’ या परिसरात त्यांच्या हस्ते अनेक विकासात्मक प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात आले. संत रविदास यांच्या अनुयायांची या स्थळी योग्य प्रकारे सोय व्हावी, यासाठी हे प्रकल्प उत्तर प्रदेश सरकारने साकारले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.