For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | शस्त्राच्या धाकाने दागिन्यांची लूट

11:45 AM Jun 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur crime   शस्त्राच्या धाकाने दागिन्यांची लूट
Advertisement

भरदिवसा पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट

Advertisement

सोलापूर : ७० फूट रोडवरील गजबजलेल्या सराफ बाजार परिसरात शनिवारी भरदिवसा पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. तीन अज्ञात तरुणांनी शिवकुमार ज्वेलर्स या दुकानात घुसून पिस्तूल व रॉडचा धाक दाखवत ४ लाख ९४ हजार रुपयांचे दोन सोन्याचे नेकलेस लंपास केले. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

दुकानमालक खुर्शीद आलम शेख (वय ४०, रा. भारतरत्न इंदिरा नगर, ७० फूट रोड) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, खुर्शीद शेख यांचे घर आणि दुकान एकाच इमारतीत असून तळमजल्यावर ‘शिवकुमार ज्वेलर्स’ हे दुकान आहे.

Advertisement

शनिवारी नेहमीप्रमाणे दुकान सुरु असताना दुपारी सुमारे १२.३५ वाजता ग्रे रंगाच्या स्कूटरवरून तीन संशयीत तरुण दुकानास समोर आले. यातील दोघा दुकानात घुसले, तर एकजण बाहेर थांबला होता. दुकानात आलेल्या एका आरोपीच्या हातात लोखंडी रॉड होता, तर दुसऱ्याने पिस्तूलसदृश वस्तू रोखून धमकावले.

संशय आल्याने खुर्शीद शेख यांनी मागील दरवाजातून बाहेर पडत आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी दुकानातून बाहेर आले आणि पिस्तूल दाखवून परिसरातील नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपींनी आणलेली ग्रे रंगाची ॲक्सेस स्कूटर (एमएच ४५-९९५१) घटनास्थळीच सोडून दिली आणि ७० फूट चौकाच्या दिशेने पळ काढला.

घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपींनी शोकेसमधून दोन सोन्याचे नेकलेस चोरल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक ढवळे हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच सदर बझार पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी सोडून दिलेली स्कूटर आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून शहरभर नाकाबंदी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.