घरात कुटुंबीय असतानाही अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी
महांतेशनगरातील प्रकाराने खळबळ
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
महांतेशनगर येथील खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याच्या घरी चोरी झाली आहे. घरातील मंडळी हॉलमध्ये झोपलेली असताना खिडकीचे गज उचकटून सुमारे 16 लाख रुपयांहून अधिक किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने पळविले आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे.
घरातील मंडळी असतानाच घरात चोरी होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. यासंबंधी खासगी कंपनीतील कर्मचारी शिवानंद गौडर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शिवानंद व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण उरकून ते झोपी गेले. उकाड्यामुळे हॉलमध्ये फॅन लावून सर्वजण झोपले होते. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला आहे व तिजोरीतील सोन्याचे दागिने पळविल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.