For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील कचरा कंटेनरची चोरी

10:49 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील कचरा कंटेनरची चोरी
Advertisement

नागरिक स्मार्ट होत नाहीत, तोपर्यंत शहराचा विकास होणे दिव्यस्वप्नच 

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. परंतु, जोपर्यंत नागरिक स्मार्ट होत नाहीत व त्यांना स्मार्ट सिटीचे महत्त्व लक्षात येत नाही, तोपर्यंत या शहराचा विकास होऊन शहर स्मार्ट होणे हे दिव्यस्वप्नच राहणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रशासन विविध योजना राबवून सुविधा उपलब्ध करून देत आहे. परंतु, त्याचा दुरुपयोगच होत गेला तर प्रशासनही काहीच करू शकणार नाही. शहरातील बसथांब्यांची नागरिकांनी दुरवस्था केली असून, त्याला कचराकुंडाचे स्वरुप दिले आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी अंतर्गतच शहर परिसरात ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी अॅल्युमिनियमचे कंटेनर उभे करण्यात आले आहेत. परंतु, त्यातील बऱ्याच कंटेनरची चोरी झाली आहे.

दररोज पहाटेच्यावेळी ठिकठिकाणी स्क्रॅप गोळा करणाऱ्यांपैकी, की अन्य कोणी या कंटेनर्स लांबवले आहेत? हे समजणे अशक्य आहे. परंतु, नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेले हे कंटेनर्स लांबवले गेल्याने साहजिकच कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. एकीकडे रस्त्यावर कचरा टाकू नका, असे आवाहन महानगरपालिका करते. दुसरीकडे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कंटेनर्स पळविणे, रात्रीच्यावेळी वाहन चालवताना दिसण्यासाठी लावण्यात आलेले कॅट्सआय पळविले जातात, पेव्हर्सची चोरी होते. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम म्हणजे पुढचे पाठ मागचे सपाट, अशाच पद्धतीने होत आहे. त्याला नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत गांभीर्य नसेल तर या घटना होतच राहणार. त्यामुळे सुविधा मिळाव्यात, हे सांगण्याचा अधिकारही नागरिकांना राहणार नाही.

Advertisement

चोऱ्या होत असल्याचे आढळल्यास माहिती द्या

ज्यांना कोणाला अशा पद्धतीच्या चोऱ्या होत असल्याचे आढळल्यास त्यांनी पोलिसांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांनीसुद्धा रात्रीच्या वेळी गस्त घालून अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक बनले आहे.

Advertisement
Tags :

.