For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर येथे भरदिवसा साडेचार लाखाची चोरी

12:21 PM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर येथे भरदिवसा साडेचार लाखाची चोरी
Advertisement

सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर मारला डल्ला

Advertisement

वार्ताहर/येळ्ळूर 

परमेश्वरनगर येळ्ळूर येथील तुकाराम गल्लीतील इराप्पा बाबू राऊत यांच्या घरी शनिवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने स्लॅबवरून उतरून दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश केला. कपाटामधील एक गंठण, एक अंगठी, एक चेन व कानातील टॉप्स असे अंदाजे सात तोळे सोन्याचे दागिने व रोख बाराशे ऊपयांवर डल्ला मारून चोरटे पसार झाले. चोरट्यांची चोरीची पद्धत पाहिल्यास ते याच परिसरातील आणि माहितीगार असल्याचे दिसते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इराप्पा राऊत हे चांगळेश्वरी हायस्कूलच्या प्राथमिक विभागात मुख्याध्यापक आहेत. ते पत्नी व वृद्ध वडिलांसह तुकाराम गल्लीत राहातात. शनिवारी दुपारी ते साडेबाराच्या सुमारास आपल्या पत्नीसह बेळगावला दवाखाण्याला गेले होते. वडील वयस्क असल्याने ते खालच्या मजल्यावर झोपून होते.

Advertisement

पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी या संधीचा फायदा  घेतला. घरासमोर येळ्ळूर-सुळगा मेनरोड व मेनगेटला कुलूप असल्याने चोरीचा संशय येऊ नये म्हणून मागील बाजूने स्लॅबवर उतरून त्यांनी घरात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे इराप्पा राऊत यांनी चप्पल स्टॅडमधील बुटामध्ये चावी ठेवली होती. चोरट्यांनी ती घेऊन स्वयंपाक खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेले साहित्य विस्कटून कपाटाच्या चावीने त्यानी कपाट उघडून ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने, रोख बाराशे ऊपये व हाती आलेला कानातील एक टॉप घेऊन चोरटे पसार झाले. गडबडीत लॉकर न उघडता आल्याने लॉकरमधील पंचवीस हजार ऊपये मात्र सुरक्षित राहिले. रात्री साडे नऊच्या सुमारास राऊत हे घरी आल्यानंतर ही घटना उघडकीला आली. अस्ताव्यस्त पडलेले साहित्य व कपाट पाहून त्याना धक्काच बसला. चोरट्यांनी चोरी करून परत जाताना दरवाजाला कुलूप लावून चावी होती त्या ठिकाणी ठेवली होती. यावरून चोरट्यांची राऊत यांच्या घरी नेहमी ये जा असावी व परिसरातील असावेत,अशी शंका येते.

राऊत यांनी चोरीच्या घटनेची माहीती पोलिसांना दिल्यानंतर रात्री पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. एवढे मौल्यवान वस्तू घरात असताना चावी अशी उघड्यावर चप्पल स्टॅडमध्ये कशी काय ठेवली याचे आश्चर्य आहे. समोरच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची जाणीव चोरट्यांना होती. समोर मोकळ्या जागेत त्याचवेळी मुले खेळत होती. त्यांची नजर चुकवत  चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे दिसते. सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांनी 2.46 वाजता प्रवेश केल्याचे दिसते. यामध्ये चोरट्यांची छबी कैद झाली असून तिघांच्या प्रतिमा दिसत आहेत पण त्याअस्पष्ट असल्याने चेहरे ओळखता येत नसल्याने चोरट्यांची ओळख सापडत नाही. या दिवसात शेतीकामामुळे साहसा ग्रामीण भागात घरी कोणी नसते. आणि भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. आदित्य राजन यांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजसह घटनास्थळाची पाहाणी करून माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास पी.एस.आय. राजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महेश नाईक, श्रीकांत उपार, बालेश पडनाळ करीत आहेत.

Advertisement
Tags :

.