For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

31 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा 24 तासात पर्दाफाश

31 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा 24 तासात पर्दाफाश
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर) : वेंगुर्ले तालुक्यातील आडारी-टेंबवाडी येथील मनीषा गुंडराज शिरोडकर यांच्या घराचे दर्शनी दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून तब्बल ३१.५ तोळे सोन्याचे दागिने चोरीस नेल्याच्या घरफोडीचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वेंगुर्ले पोलिस यांनी संयुक्त तपास करून अवघ्या २४ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याने साथीदारासोबत चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यालाही ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या तात्काळ कारवाईमुळे वेंगुर्ले पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडारी, टेंबवाडी, ता. वेंगुर्ला येथे दि. १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत १४ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात चोरट्याने फिर्यादी मनीषा शिरोडकर यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ३१.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वेंगुर्ले पोलिस यांच्या पथकाने संयुक्तपणे तपास सुरू केला. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकास त्याच्या राहत्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदर घरफोडीचा गुन्हा एका १८ वर्षीय युवकासोबत केल्याचे सांगितले.
सदरची कारवाई हि पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय सुरेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल महेश समजिस्कर, अमर कांडर तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे, हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार, पोलीस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर, मनोज परुळकर, आकाश घाटगे व पंकज पाटील यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.