जिल्ह्यात चोरीच्या घटनांची मालिका
बेळगाव शहर-तालुका, बैलहोंगल, रामदुर्गमध्ये चोऱ्या : लाखोंचा ऐवज लंपास
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यातील गावांबरोबरच जिल्ह्यातही चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग तालुक्यात चोऱ्या झाल्या आहेत. बैलहोंगलमध्ये दोन घरे फोडण्यात आली असून रामदुर्गमध्ये एका रात्रीत पाच घरफोड्या झाल्या आहेत. हिरेबागेवाडी येथेही चोरीची घटना घडली आहे. पडीबसवेश्वरनगर, हिरेबागेवाडी येथील सुजाता मल्लाप्पा कुंभार यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाखांचा ऐवज पळविला आहे. 11 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता त्या आपल्या घराला कुलूप लावून काकती येथील आपल्या बहिणीच्या घरी आल्या होत्या. रविवारी 13 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता पाहिले असता चोरीची घटना उघडकीस आली. कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 15 ग्रॅमचा नेकलेस, 5 ग्रॅमची बोरमाळ, अंगठी, झुमके, कर्णफुले असे सुमारे 50 ग्रॅमहून अधिक सोन्याचे दागिने, चांदीची आरती, 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद
शनिवारी मध्यरात्रीनंतर रामदुर्ग येथे एका रात्रीत पाच घरे फोडण्यात आली आहेत. चोरट्यांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. इरय्या चिक्कमठ, मरियप्पा होरकेरी, वैष्णवी आराध्य, विनायक तुंबरमट्टी व पद्मनाभ चोळचगुड्ड यांची घरे फोडण्यात आली आहेत. पद्मनाभ यांच्या घरातून 4 तोळे सोन्याचे दागिने पळविण्यात आले आहेत. उर्वरित घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. रामदुर्ग पोलीस स्थानकात या घटनांची नोंद करण्यात आली आहे. मुर्कीभावी रोड, बैलहोंगल येथील दोन घरे फोडून दहा लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. चोरट्यांनी 11 तोळे सोने, 2 किलोनजीक चांदी, 70 हजार रुपये रोख रक्कम पळविली आहे. इंचल येथील शिवयोगीश्वर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य गंगाधर सदाशिवप्पा हादिमनी यांचे साई मार्ग, बैलहोंगल येथील घर फोडून 6 तोळे सोने, 2 किलो चांदी व 70 हजार रुपये रोकड पळविली आहे. तर सत्य मार्ग, बैलहोंगल येथील शिवशंकरगौडा पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून 5 तोळे सोने, 10 तोळे चांदी पळविण्यात आली आहे. बैलहोंगल पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे.
परगावी जाताना शेजाऱ्यांना किंवा जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती द्या!
सध्या शाळांना सुटी आहे. त्यामुळे लोक आपल्या मुलांसमवेत परगावी जात आहेत. हीच संधी साधून चोरटे सक्रिय झाले आहेत. बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. परगावी जाताना आपल्या शेजाऱ्यांना किंवा जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.