महिला पोलीस निरीक्षकाच्या घरातच चोरी
20 लाखांचा ऐवज लंपास : कारवार येथील घटनेने खळबळ
कारवार : येथील जिल्हा प्रमुख कार्यालयातील डीसीआरबी विभागात साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावणाऱ्या स्मिता गोपाळ पावसकर (रा. विजयनगर-खुर्सावाडा-कारवार) यांच्या घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लांबविलेल्या ऐवजामध्ये 18 लाख 85 हजार रुपये किमतीचे 357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 72 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या चोरी प्रकरणाबद्दल दिलेली अधिक माहिती अशी, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते 2 फेब्रुवारी सायंकाळी 7.20 या कालावधीत अज्ञाताने पावसकर यांच्या घराचा इंटर लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील ट्रेझरी फोडून लॉकरमधील रोख रकमेसह सोन्याचे आणि चांदीच्या दागिन्याचा सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळताच कारवार जिल्हा प्रमुख एम. नारायण यांनी पावसकर यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरांची माहिती जिल्हा पोलीसप्रमुखांना, कारवार डीवायएसपींना, कारवार शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना किंवा कंट्रोल रुमला देण्याचे आवाहन पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी केले आहे. कारवार शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी झाल्याने कारवार नगरासह तालुक्यात खळबळ माजली आहे.