वडगाव येथील श्री शिवमंदिरात चोरी
पाऊणलाखाचे साहित्य पळविले
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात घरफोड्यांपाठोपाठ मंदिरांमध्ये चोऱ्या वाढल्या आहेत. वडगाव येथील श्री शिवमंदिर फोडून सुमारे पाऊणलाखाचे साहित्य पळविण्यात आले आहे. सहा दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली असून शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
वडगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्र. 5 समोर असलेल्या श्री शिवमंदिरात चोरीची घटना घडली आहे. सुशांत मनोहर तरळेकर यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी पुढील तपास करीत आहेत.
सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी मंदिराचा कडीकोयंडा तोडून पितळी नाग, चांदीचा गणपती, दानपेटी, घंटा, मुखवटा असे सुमारे पाऊणलाखाचे साहित्य पळविले आहे. नेहमीप्रमाणे रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री मंदिराला कुलूप लावण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
गुन्हेगारांनी बंद घरांपाठोपाठ आता मंदिरांनाही लक्ष्य बनविले आहे. पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले असून मंदिरांमधील वाढत्या चोऱ्यांमुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. बंद घरे व मंदिरांना लक्ष्य बनविणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.