गोजगे कलमेश्वर मंदिरमध्ये चोरी
एक लाखाच्या वस्तू लांबविल्या : चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
गोजगे येथील कलमेश्वर मंदिरातील अनेक वस्तूंची चोरी झाल्याचे रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमाराला उघडकीला आले. जवळपास एक लाखाच्या वस्तू चोरट्यानी लांबविल्याचे समजते. गोजगे गावापासून एक किलोमीटर अंतरावर कलमेश्वर मंदिर आहे. रविवारी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील घंटा, तांब्याच्या कळशी, चांदीच्या मूर्ती, समई तसेच दानपेटीतील रक्कम अशी एकूण अंदाजे एक लाखाची चोरी झाल्याचे सायंकाळी पाचच्या सुमाराला उघडकीस आले.सायंकाळी पाचच्या सुमाराला पुजारी स्वच्छता करण्यासाठी मंदिरामध्ये गेला असता मंदिराचे कुलूप तोडून दरवाजे खुले असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने आत पाहिले तर घंटा व इतर वस्तू नसल्याचे निदर्शनाला आले. त्यांनी सदर वृत्त देवस्की पंच कमिटीला कळविले. तातडीने काकती पोलीस स्टेशनला संपर्क साधून चोरी झाल्याचे सांगण्यात आले. काकती पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मंदिरातील चोरीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीचा तातडीने तपास करून चोरांना जेलबंद करावे अशी मागणी पंच कमिटी आणि ग्रामस्थांनी केली आहे.