खानापूर येथील मेदार लक्ष्मी मंदिरात चोरी
पावणे तीन तोळे सोने-750 ग्रॅम चांदीचे दागिने लंपास : भरवस्तीत चोरीच्या घटनेने खळबळ
चोरीस गेलेले सोन्याचे दागिने -मंगळसूत्र, नेकलेस, बोरमाळ
चांदीचे दागिने -किरीट, बाजूबंद, कमरपट्टा, पैंजण, पायातील तोडे
खानापूर : शहराच्या भरवस्तीत असलेल्या मेदार श्री महालक्ष्मी मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली असून चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा कटरने तोडून मंदिरात प्रवेश केला. गर्भगृहाच्या दरवाजाचा कडीकोयंडा कटरने तोडून देवीच्या मूर्तीवरील पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, तसेच 750 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. मंगळवारी पहाटे 5 वाजता पुजारी मंदिराची झाडलोट करण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली. यानंतर ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मंदिरापासून नव्या बसस्थानकाच्या मागील बाजूच्या रस्त्यापर्यंत माग काढला. या घटनेची खानापूर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
कडीकोयंडा कटरने तोडला
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बुरुड गल्लीत मेदार महालक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराचा गेल्या काही महिन्यांपूर्वी नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला होता. तसेच या मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती नव्याने बनवण्यात आली आहे. या मूर्तीवर सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने कायम घालण्यात येतात. चार दिवसांपूर्वी या मंदिराच्या पुजाऱ्याची कामाची पाळी बदलली होती. आणि एम. आर. पाटील यांच्याकडे पूजेचा हक्क आला होता. दोनच दिवसांपूर्वी मंदिराचे दागिने आणि इतर साहित्य एम. आर. पाटील यांच्या हाती जयपाल पाटील बंधूंनी सुपूर्द केले होते. सोमवारी रात्री रोजच्याप्रमाणे आरती करून मंदिर रात्री 10 वाजता बंद करण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री 2 ते 3 च्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडी कटरने तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गर्भगृहाच्या दरवाजाचा कडीकोयंडा कटरने तोडला.
चोरट्यांनी देवीवरील पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. यात मंगळसूत्र, नेकलेस, बोरमाळ तर चांदीचे 750 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले आहेत. यात चांदीचे किरीट, बाजूबंद, कमरपट्टा, पैंजण आणि पायातील तोडे यांचा समावेश आहे. रोजच्याप्रमाणे पुजारी पहाटे 5 वाजता मंदिराची झाडलोट करण्यासाठी आले असता मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. आणि कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी आत प्रवेश करून पाहिले असता गर्भगृहाचा दरवाजाही उघडा दिसला. देवीवरील दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पंचमंडळी आणि महालक्ष्मी यात्रा कमिटीला याबाबतची माहिती दिली.
यात्रा कमिटीने पोलीस स्थानकाला माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात पाहणी करून मंदिरात कुणालाही प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर बेळगाव येथील ठसे तज्ञांना आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मंदिरापासून नवीन बसस्थानकाच्या मागील बाजूच्या जांबोटी क्रॉस ते पारिश्वाड क्रॉस रस्त्यापर्यंत मार्ग काढला. या ठिकाणी घुटमळत राहिले. तसेच ठसे तज्ञांनी नमुने घेतले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. बुरुड गल्ली परिसरातील, तसेच लक्ष्मीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करत आहेत.
शहरात मंदिरात चोरी होण्याची पहिलीच वेळ
शहरात मंदिरात चोरी होण्याची पहिलीच वेळ असल्याने खळबळ माजली आहे. भरवस्तीत मंदिरात चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तालुक्यात चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात एकाच रात्री सहा गावात चोरी झाली होती. यात रोख 15 लाख आणि 18 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. बसस्थानकावर मोबाईल, पैशाची पाकिटे चोरणे या घटनाही वारंवार घडत आहेत. मेदार महालक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याचे समजताच पहाटे यात्रा कमिटीचे पदाधिकारी, तसेच मेदार लक्ष्मी मंदिर कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य, शहरातील नागरिक आणि भक्त मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमा झाले होते.
देवस्थानचे दागिने अथवा रक्कम बँक लॉकरमध्ये ठेवा
खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गवंडी हे घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मंदिराच्या पुजारी तसेच व्यवस्थापकांनी देवस्थानचे दागिने अथवा रक्कम बँक लॉकरमध्ये ठेवावी. तसेच विशेष उत्सवाच्या दिवशी आणि पूजेच्यावेळी दागिने मूर्तीवर घालण्यात यावेत. पुन्हा सायंकाळी दागिने काढून लॉकरमध्ये ठेवावेत, तसेच मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.