लोकोळी लक्ष्मी मंदिरात चोरी
26 ग्रॅम सोने, 50 ग्रॅम चांदीचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
खानापूर : तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात मंगळवारी रात्री चोरी झाली असून 26 ग्रॅम सोन्याचे आणि 50 ग्रॅम चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सकाळी पुजारी नित्यपूजेसाठी देवळात गेल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी गाव पंच कमिटीला बोलावून याची माहिती दिली. यानंतर खानापूर पोलीस स्थानकात फिर्याद नोंद करण्यात आली आहे. लोकोळी येथील ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी मध्यरात्री 1 ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी बाहेरील दरवाजा तोडून गर्भगुडीच्या दरवाज्याचे कुलूप कापून आत प्रवेश केला. मूर्तीवरील सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे.
महालक्ष्मी मंदिर हे लोकोळी गावच्या मध्यभागी असून मंदिराच्या शेजारीच सार्वजनिक गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रात्री 1 वाजेपर्यंत गणपती मंडपात कार्यकर्ते होते. रात्री 1 नंतर कार्यकर्ते घरी गेल्यानंतर चोरट्यांनी डाव साधला. सकाळी पुजारी विनायक सुतार हे मंदिरात गेले असता मंदिराचा समोरील दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळला. आतील गर्भगुडीचा दरवाजा उघडा दिसला. तसेच मूर्तीवरील दागिने नाहीसे झालेले पाहताच त्यांनी याबाबतची माहिती गाव पंच कमिटीला दिली. ही माहिती समजताच गावकरी आणि पंच कमिटी देवळात जमा झाली.
खानापूर स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मंजुनाथ नाईक यांनी तातडीने याबाबतची माहिती श्वानपथक आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिली. श्वान पथकातील श्वान देवळाच्या समोरील रस्त्यावरून काही मीटर अंतरावर जाऊन घुटमळत राहिले. त्यानंतर अतिरिक्त पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. गावातील काही सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून अतिरिक्त पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागात दिवसाढवळ्या चोऱ्या होत होत्या. अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र आता मंदिरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.