For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चापगाव येथील फोंडेश्वर मंदिरात चोरी

12:53 PM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
चापगाव येथील फोंडेश्वर मंदिरात चोरी
Advertisement

10 लाख 30 हजारचे चांदीचे  दोन मुखवटे लंपास : घटनेने परिसरात खळबळ

Advertisement

खानापूर : तालुक्यातील चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिरातील फोंडेश्वर देवाच्या मूर्तीवर नव्याने बसविण्यात आलेले चांदीचे दोन मुखवटे चोरीस गेल्याची घटना रविवार दि. 1 मार्च रोजी पहाटे उघडकीस आली. अलीकडेच महाशिवरात्रीनिमित्त सुमारे दहा लाख 30 हजार रुपये खर्चून हे मुखवटे बसविण्यात आले होते. या घटनेची नोंद  नंदगड पोलीस स्थानकात झाली असून श्वानपथक आणि ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. चापगावमधील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, चापगाव येथे फोंडेश्वर मंदिर असून मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला होता. तसेच मंदिरातील दोन देवांच्या मूर्तीवर नव्याने शिवरात्रीला पाच किलो चांदीचे मुखवटे बसविण्यात आले होते.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचा समोरील दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला आणि गाभाऱ्याच्या खिडकीतून गाभाऱ्यात प्रवेश करून देवावर बसविण्यात आलेले चांदीचे मुखवटे पळविल्याचे निदर्शनास आले आहे. रविवारी पहाटे पाच वाजता भाजीपाला बाजारात नेण्यासाठी आलेले टेम्पोचालक आणि शेतकऱ्यांना मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. तातडीने गावकऱ्यांना ही माहिती देण्यात आली. सर्व ग्रामस्थ पहाटे सहा वाजता मंदिराकडे जमा झाले आणि याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक रविकुमार धर्मट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Advertisement

पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धर्मट्टी यांनी या चोरीची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. तातडीने ठसेतज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक मंदिरातून चापगाव वड्डेबैल रस्त्यावर असलेल्या मंदिराच्या कमानीपर्यंत येऊन घुटमळले. त्यामुळे चोरट्यांनी येथून वाहनाने पलायन केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. श्री फोंडेश्वर हे चापगावचे ग्रामदैवत असून मंदिरात पूर्वापार असलेले पंचधातूचे मुखवटे केवळ दसरा व माघ पौर्णिमेच्या यात्रेत वापरला जातात. दगडी मूर्तीवर चांदीचा मुखवटे बसविण्यासाठी शेकडो भक्तांनी चांदी दान केली होती. मात्र अवघ्या पंधरा दिवसांत मुखवटे चोरीस गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सखोल चौकशी करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.