For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देसूर विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी

06:22 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
देसूर विठ्ठल रखुमाई मंदिरात चोरी
Advertisement

मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने लांबविले

Advertisement

वार्ताहर/ किणये

पाटील गल्ली, देसूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात शुक्रवारी रात्री चोरी झाली. मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून विठ्ठल व रखुमाई या दोन्ही मूर्तींच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. हा चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. गावातील मंदिरात चोरी झाली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

सध्या ग्रामीण भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच एकाच रात्री सोनोली गावात 17 तांब्याचे हंडे चोरीला गेले. तसेच मच्छे येथे घराजवळ ठेवलेला तांब्याचा बंब चोरीला गेला. मच्छे येथील एक कारखाना फोडण्याचा प्रयत्न झाला. तर आता देसूर गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी झाल्यामुळे ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

देसूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या बाजूलाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते शुक्रवारी रात्रीपर्यंत मंडळाचा हिशेब करीत होते. सदर कार्यकर्ते घरी गेल्यानंतर रात्री 3 ते 5 च्या दरम्यान चोरी झाल्याचा संशय गावकरी व्यक्त करीत आहेत. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून मंदिरात प्रवेश केला व गाभाऱ्यात जाऊन विठ्ठल-रखुमाई मूर्तींच्या डोक्यावरील चांदीचे किरीट, विठ्ठलाच्या कानातील मासोळीच्या आकाराच्या चांदीची कर्णफुले, रखुमाईच्या मूर्तीवरील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

रोजच्याप्रमाणे शनिवारी सकाळी सातेरी मालजी हे मंदिरात पूजा करण्यासाठी आले होते. त्यावेळी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच गावातील पंचमंडळींना माहिती दिली. गावातील मंदिरात चोरी झाल्यामुळे मंदिर परिसरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वडगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

Advertisement
Tags :

.