देशी भांगेची झिंग
मध्यप्रदेशातील उज्जैन शहर हे विदेशी पर्यटकांचे महत्वाचे आकर्षणस्थळ आहे. विदेशी पर्यटक या शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू पाहतात तसेच पुराणकालाrन मंदिरेही पाहतात. महाकाल मंदिरातील लाडू प्रसाद अनेक विदेशी पर्यटकांना आवडतो. असाच एक सॅम पेपर नावाचा ब्रिटीश पर्यटक या शहरात आला होता. त्याला येथील ‘भांग’ चाखून पाहण्याची हुक्की आली. त्याने शहरातील एका दुकानात जाऊन एक पेला भांगेचा आस्वाद घेतला. भांग ही प्रकृतीसाठी योग्य मानली जात नाही. विशेषत: ज्यांना ती पिण्याची सवय नसते त्यांना प्रथम तिचा त्रासच होतो. या ब्रिटीश पर्यटकालाही असाच अनुभव आला.
एक पेला भांग प्राशन केल्यानंतर काही काळ त्याला बरे वाटले. हा प्रकार खूपच चवदार आहे अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. पण काही वेळातच या देशी भांगेने आपला प्रताप दाखविण्यास प्रारंभ केला. सॅमला सपाटून उलट्या होऊ लागल्या. अचानक त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले. जसजशी भांग चढू लागली तसा तो आरडाओरडा करु लागला. वास्तविक भांग प्यायल्यानंतर झोप येते आणि पिणारा शांतपणे एका जागी पडून राहतो, असे म्हणतात. पण पेपर याला उलटाच अनुभव येत होता. अखेर त्याची स्थिती पाहून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही त्याने आरडाओरडा आणि गोंधळ करण्यास प्रारंभ केला. त्वरित त्याच्यावर उपचार करण्यात आले. काही काळानंतर तो शांत झाला. नंतर त्याने स्वत:च ही माहिती इन्स्टाग्रॅमवर छायाचित्रांसह प्रसिद्ध केली. त्याचा या अवस्थेतील व्हिडीओला सध्या खूप प्रसिद्धी मिळत आहे. ‘भारतात निर्माण होणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू त्याच्यासारख्या विदेशींसाठी नाहीत, अशी खोचक टिप्पणी एका व्यक्तीने केली आहे. एकंदर, देशी भांगेचा हा अनुभव या विदेशी पर्यटकाच्या लक्षात बराच काळ राहणार आहे, अशी अनेकांची खात्री त्याची अवस्था पाहून झालेली आहे.