भारतीय युवा फुटबॉल संघ आज बांगलादेशचे आव्हान पेलण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ काठमांडू
‘सॅफ’ 20 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत आज भारताचा पुरुषांचा राष्ट्रीय संघ उपांत्य फेरीत बांगलादेशचा सामना करेल. हा सामना आज सोमवार 26 ऑगस्ट रोजी काठमांडू, नेपाळ येथील आन्फा कॉम्प्लेक्स येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2.45 वा. सुरू होईल.
भूतान आणि मालदीववर प्रत्येकी 1-0 असा विजय मिळवत भारताने मोहिमेची सुऊवात चांगली केली आहे आणि गट ‘ब’मध्ये अव्वल ठरत त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, बांगलादेश 2022 मधील स्पर्धेचे उपविजेते आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक रंजन चौधरी यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले की, बांगलादेश पारंपरिकपणे या स्पर्धेतील एक मजबूत संघ राहिला आहे आणि आज आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
भारताने स्पर्धेत फक्त दोन गोल केले आहेत आणि शेवटच्या चार संघांमधील सर्वांत कमी गोल त्यांनी केलेले आहेत. तथापि, चौधरी आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल उत्साही आहेत. ‘आम्ही असे एकमेव संघ आहोत ज्याने अद्याप एकही गोल स्वीकारलेला नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये आमचा बचाव खूपच चांगला राहिलेला आहे. परंतु आम्ही त्यावर समाधाने राहू शकत नाही. आम्ही बाद फेरीतही ही चांगली कामगिरी कायम ठेवली पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे एक बचाव असतो तेव्हा तुम्हाला आक्रमण करण्यासाठी चांगला पाया लाभतो’, असे ते म्हणाले.
भारतीय संघ आपला खेळ सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. भूतानविऊद्धच्या सलामीच्या लढतीत मैदानाबाहेर रवानगी झालेला सेंटर-बॅक परमवीर आणि प्लेमेकर वानालालपेका गुइटे हे एका सामन्याच्या निलंबनानंतर परतलेले असून त्याचे भारत स्वागत करेल. तथापि, भूतानविऊद्ध विजयी गोल करणारा स्ट्रायकर मोनिऊल मोल्ला याला साखळी स्तरावरील दोन सामन्यांत पिवळे कार्ड दाखविण्यात आलेले असल्याने त्याची उणीव भासणार आहे.